Home कृषीजागर डॉ प्रभाकर कवठेकरांनी डोंगराळ-मुरमाड जमिनीत फूलवली केशर आंब्याची बाग!

डॉ प्रभाकर कवठेकरांनी डोंगराळ-मुरमाड जमिनीत फूलवली केशर आंब्याची बाग!

बीड, (आनंद ढोणे पाटील) महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यातील काही भूभाग हा डोंगराळ येतो. अशा ठिकाणच्या जमीनी देखील हलक्या ते मध्यम मुरमाड प्रतीच्या आहेत. तेथे सिंचनासाठी कोणतेही धरण अथवा मोठा शेतलाव नसल्याने अशा डोंगराळ भागातील जमीनीस कायम बागायती पिके घेण्यासाठी कायम पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी विहीर, बोअरवेल आणि शेततळ्याच्या थोडक्या पाण्यावर कमी पाण्यात अधिक उत्पादन देणा-या फळबागा लागवड करुन त्याचे थिबकवर संगोपन करुन कमी पाण्यात, कमी खर्चात अधिक विविध वाणांच्या फळाचे भरघोस उत्पादन घेत आहेत. याच प्रमाणे बीड जिल्हा पाटोदा तालूक्यातील पिट्टी येथील शेतकरी डॉ प्रभाकर रामराव कवठेकर यांनी आपल्या शेतात डोंगराळ-मुरमाड मध्यम प्रतीच्या जमीनीत केशर आंबा व डाळिंब लागवड करुन ती फुलवून दाखवली आहे. त्या फळबागेपासून भरघोस असे उत्पादन घेत लक्षावधी रुपये निव्वळ नफा मिळवत ईतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहेत.
पिट्टी गावचे वय वर्ष ५८ असलेले बि व्ही एस सी ( व्हेटर्नरी) शिक्षण घेतलेले डॉ प्रभाकर रामराव कवठेकर हे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्यात सहाय्यक पशूधन विकास अधिकारी म्हणून सेवा करत असताना शुध्दा सुट्टीच्या दिवशी व रिकाम्या वेळेत आपली वडिलोपार्जित असणारी शेती देखील आवडीने करतात. त्यांना पिट्टी गाव शिवारात जवळपास १८ एकर शेतजमीन आहे. परंतु ती जमीन काही चांगल्या तर काही ठिकाणी डोंगराळ-मुरमाड प्रतीची आहे. या जमीनीत त्यांनी बागायती पिकासाठी विहीर, बोअरवेल आणि एक ३३ बाय ३३ फूट आकाराचे शेततळे खोदून पाण्याची सोय करुन घेतली आहे. सदरील जमीनीत ते खरीपात सोयाबीन, तूर, मुग,उडीद कपाशी ही पिके घेतात तर त्यांच्या शेतीत केशर आंबा, डाळींब, पपई,भाजीपाला, टोमॅटो हि पीके शुध्दा उभी आहेत.
केशर आंब्याचे मिळतेय भरघोस उत्पादन
———
डॉ कवठेकर यांनी वर्ष २०११ ला राहूरी कृषी विद्यापीठ येथील रोपवाटीकेतून शुद्ध केशर आंब्याची १५० रोपटे आणून २० बाय २० फूट अंतरावर त्याची लागवड केली. झाडांच्या सिंचनासाठी थिबकसंच बसवला आहे. तसेच दरवर्षी जून महिन्यात झाडाच्या बुंध्यापासून अडीच फूट अंतरावर शेणखत व काही आवश्यक रासायनिक खतांची प्रती झाड दोन किलो मात्रा देतात. पावसाळा संपल्यानंतर जो पर्यंत आंब्याच्या झाडाला मोहर येत नाही तोपर्यंत पाणी दिले जात नाही. पौंष महिन्यात मोहोर आल्यावर आठ दिवस आड करुन थिबक द्वारे सतत पाणी दिले जाते. तसेच डोंगराळ भाग असल्यामुळे मोहोर फूलोरा धारण होण्यासाठी कोणत्याही कल्चर च्या वापराची गरज पडली नाही.

ईतर काही शेतकरी मोहोर येण्यासाठी कल्चरचा वापर करतात. योग्य नियोजनाच्या संगोपणाने त्यांची केशर आंबा बाग आता मोठी होवून ती ११ वर्षाची झाली आहे. केशर अंब्यास लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळधारणा झाली. पहिल्या वर्षी अंबा फळांचे १ टन उत्पादन झाले. त्यानंतर दरवर्षी झाडांची उंची व फांद्या विस्तार वाढत गेल्याने अपोआपच उत्पादनात वाढ होत गेली. यंदाच्या २०२२ या वर्षी १२ टन अंबा फळांचे उत्पादन झाले. आतापर्यंत एकूण ४० टनांपेक्षा अधिक अंबा उत्पादन झाल्याचा हिशोब आहे. पहिल्या वर्षी म्हणजे वर्ष २०१५ ला परिपक्व पाडाला आलेल्या हिरव्या १ टन उत्पादीत अंबा फळांस स्थानिक बाजारात ५० ते ६० रुपये दर मिळाला. तर त्यानंतर केशर आंब्याच्या बागेची व उत्कृष्ठ दर्जा, शुद्ध केशर, सुवासिक सुंगध, अतिशय गोड चव केशर आंबा डॉ कवठेकर यांच्या बागेतील आहे असा प्रचार प्रसार झाल्यावर दरात वाढ होवून पाडाला आल्यानंतर परिपक्व काढणी केलेल्या हिरव्या अंबा फळास स्थानिक बाजार व व्यापा-याकडून १७० रु प्रति किलो दर मिळत गेला तर बीड येथील ईंद्रपस्थ काॅलनीत नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या केशरला २०० रुपये दर मिळत आहे. या पध्दतीने त्यांना आजतागायच्या ४० टन अंबा विक्रीतून सुमारे २५ लाख रुपये उत्पन्न मिळाले तर त्यासाठी सर्व मिळून उत्पादन खर्च ८ लाख रुपये आला यातून उत्पादन खर्च ८ लाख वजा जाता १७ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
त्याच बरोबर त्यांच्या शेतीत ५ एकरवर भगवा वाणाच्या डाळींबाची लागवड आहे. शिवाय पपई आणि वर्षभर चालेल असे टोमॅटो फळभाजीचे उत्पादन घेतले जाते. डाळिंब, पपई, भाजीपाला यातुनही चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. शेतीकामात त्यांच्या पत्नी सौ मंगलाताई, मुलगा इंजिनिअर राहूल हे मदत करतात. त्यांच्या शेतीत नेहमीच गावातील अनेक मजूरांना रोजगार मिळत आहे. डॉ प्रभाकर कवठेकर यांनी डोंगराळ भागात मुरमाड जमीनीत मोठ्या कष्टाने जिद्द व चिकाटी पणाला लावून केशर आंबा, डाळिंब, पपई ह्या फळबाग फुलवल्याने त्यांची शेतीची प्रेरणा बिड जिल्ह्यसहच सर्वदूर भागातील शेतकरी घेत आहेत.

Previous articleहिमायतनगर परिसरातील अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी फोफाळली.
Next articleथकीत पिक कर्ज नूतनीकरण केल्यास लगेच दुसरे कर्ज मिळणार