Home Breaking News एक गाव एक स्मशानभूमी हीच महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल — कांतरावजी देशमुख

एक गाव एक स्मशानभूमी हीच महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल — कांतरावजी देशमुख

परभणी,जि/प्र.(आनंद ढोणे पाटील यांजकडून)
प्रत्येक गावात एक गाव एक स्मशान भूमी बनवणे हीच महापुरुषांच्या खऱ्या समतावादी विचारांना आदरांजली ठरेल. स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना संविधानातून करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर प्रत्येक गावात “एक गाव एक स्मशान भूमी बनवणे आवश्यक आहे. एक गाव एक स्मशान भूमी बनवण्यासाठी आपापल्या गावात परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करतो आपण सर्वजण असेच मातृभूमीचे ऋण फेडू या असे प्रतिपादन झरी गावचे जनक,प्रगतशील-प्रयोगशिल शेतकरी तथा कृषीभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. परभणी
येथून जवळच असलेल्या नांदगाव बुद्रुक येथे ” स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी अभियाना” अंतर्गत कामाला प्रारंभ करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील जवळपास १०० गावांमध्ये स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी अभियानाने आता गती घेतली आहे. सदरील अभियानाचे संकल्पक कृषिभूषण कांतरावजी काका देशमुख झरीकर यावेळी अध्यक्षपदावरुन बोलत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला हे अभियान राबवणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विचारपीठावर ग्रामगीतेचे अभ्यासक तथा शिक्षणतज्ञ डॉक्टर दिलीप शृंगार पुतळे दैनिक देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी सुरज कदम, मांडवा येथे एक गाव एक स्मशानभूमी साकार करणारे सरपंच सोपानराव आरमाळ, मराठा सेवा संघाचे प्रवक्ते सुभाष ढगे, गोविंदराव दुधाटे कैलास काळे, रंगनाथ दादा दुधाटे, बळीरामजी खटींग ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.
पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या नांदगाव या गावी स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी बनवण्याचा संकल्प याप्रसंगी गावकऱ्यांनी केला. पूर्णा नदीच्या काठी वाढलेल्या वेड्या बाभळींचे निर्मूलन करण्यासाठी जेसीबी द्वारे कामाला प्रारंभ करण्यात आला.
स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी मी अभियानात एक गाव एक स्मशानभूमी साकार करणारे मांडवे चे सरपंच सोपानराव आरमाळ यांनी आपले अनुभव कथन केले सुनेगाव या गावी एक गाव एक स्मशान भूमी साकार करताना आलेल्या अडचणी व त्यावरील उपाय योजना करताना आलेले अनुभव कथन कृष्णा सूर्यवंशी सुनेगावकर यांनी केले. कोरोना कालावधीत लॉक डाऊन मध्ये सगळे जग थांबलेले असताना गोदावरी नदीच्या काठी देऊळगाव दुधाटे येथे काटेरी वेड्या बाभळीचे निर्मूलन करुन सुंदर स्मशानभूमी बनवून एक आदर्श स्थापन करणारे प्रगतशील शेतकरी गोविंदराव दुधाटे यांचेही मार्गदर्शन या प्रसंगी झाले. स्मशानभूमीच्या विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोण कोणत्या योजना घेता येतील, वृक्षारोपण स्मशानभूमी शेड, जनसुविधा योजना, रोजगार हमी योजना याची जोड देऊन जिल्हा परिषद पदाधिकारी यांची मदत घेऊन स्मशानभूमी कशी विकसित करता येईल? याचे सविस्तर मार्गदर्शन ग्रामसेवक बळीरामजी खटिंग यांनी केले.
तर आपले गाव स्वच्छ आणि सुंदर बनवून आपले जगणे समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची कास धरून प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर कसे बनेल यासाठी लोकसहभागातून शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी आदी सुविधा शासनाच्या मदतीने सर्व नागरिकांनी जागरुकपणे उभ्या केल्या पाहिजे. स्मशानभूमी हेच आपल्या पूर्वजांचे खरे स्मृती उद्यान आहे.हे स्मृतिउद्यान उभे करण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ भालेराव, राज टेलर, दिलीप जोंधळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज टेलर यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी केले.

Previous articleबाळापुर शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी..
Next articleकांतराव झरीकर यांचा संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्याकडून सत्कार