Home Breaking News आरपीएफ अधिकाऱ्यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे…

आरपीएफ अधिकाऱ्यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे…

योगेश घायवट जिल्हा प्रतिनीधी अकोला भूमीराजा 

धावत्या रेल्वेत चढणं एका बापलेकाला चांगलंच जीवावर बेतलं असतं. मात्र, कर्तव्यावर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानानं या बाप-लेकाचा जीव वाचला. ही घटना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दुपारी १२ वाजून २६ मिनिटांनी भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस आली असता, या गाडीतून कटक ते मनमाड असा प्रवास करत असलेल्या साहू कुटुंबीयांपैकी वडील सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू हे पाणी पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले.

पाण्याच्या बाटल्या भरे पर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्म पुढे रवाना झाली. गाडी सुटल्याचे पाहून सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू हे दोघे धावत त्यांच्या डब्यापर्यंत पोहोचले आणि रेल्वेच्या दरवाजातून चढण्याचा प्रयत्न करू लागले. ओल्या हातांमुळे पकड निसटली अन् मुलगा शरदचंद्र हा चालत्या रेल्वेतून खाली कोसळला. मुलाच्या पाठीमागे धावत असलेले त्याचे वडील देखील मुलाच्या अंगावर कोसळले. ते थेट रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाऊन अडकले.

यावेळी प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेले आरपीएफ पोलिस निरीक्षक युनूस खान, पोलीस उपनिरीक्षक एस. एम.शाह तसेच सहायक उपनिरीक्षक पाटील यांनी हा प्रकार पाहिला. उपनिरीक्षक एस.एम शाह यांनी धाव घेत शरदचंद्र साहू याला प्लॅटफॉर्ममध्ये अडकण्यापासून वाचविले. मात्र, हे दृष्य पाहून उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु, इथे असलेले पोलिस निरीक्षक युनूस खान यांनी सौरभ साहू यांना धीर देत फलाटाच्या भिंतीला चिकटून राहण्यास सांगितले. ‘कुछ नही होगा, आप शांत बैठो’ असा धीर दिला.

साहू यांनी त्यांचं म्हणणे ऐकलं, तोपर्यंत रेल्वे चालकाला या घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर लागलीच रेल्वे थांबविण्यात आली. युनूस खान यांनी तातडीनं धाव घेत सौरभ साहू यांना बाहेर काढले. दोघेही बापलेक पुढील प्रवासासाठी रवाना झाले. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान आरपीएफ अधिकाऱ्यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतूक केलं जातं आहे.

Previous articleशेकडो कार्यकर्त्यांनी घेतला श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
Next articleकर्नाटकचे नवे मुख्यमंत्री धनगर समाजाचे सुपुत्र सिध्दरामय्या !