Home कृषीजागर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

👉 भागवत देवसरकर यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.

दि.12 जुलै. 2022
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड

मागील आठवडाभरापासून आष्टी तामसा परिसरासहित हदगांव-हिमायतनगर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही. सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून, नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा. अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे भारतीय जनता पार्टीचे भागवत देवसरकर यांनी केली आहे.

चालू खरीप हंगामामध्ये आष्टी,तामसा महसूल मंडळात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते.

काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती. परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. व तसेच यासंदर्भात राज्यसरकारकडे माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून अतिवृष्टीनेग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.

Previous articleसन्यासी वृत्तीने समाजात काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणे गरजेचे……
Next articleहिमायतनगर तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे पुन्हा संकटात…