जिल्ह्यातील एकमेव शाळा: पवई येथे किरण बेदी, सानिया नेहवाल यांच्या हस्ते झाला गौरव
खामगाव :शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे)
शहरातील घाटपुरी नाका परिसरात असलेल्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत नावारूपास आलेल्या आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजला इंडियन टॅलेन्ट ऑलिम्पियाडकडून बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. १८ मार्च रोजी पवई येथे हिरानंदानी गार्डनमधील रिचमाँड या नावाजलेल्या हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज ही संस्था यावर्षी बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्डसाठी पात्र ठरलेली बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. पॉंडिचेरीच्या माजी राज्यपाल, भारतातील पहिल्या महिला आयपीएस, पोलीस महानिरीक्षक तथा रॅमन मेगेसेसे पुरस्कारप्राप्त किरण बेदी, आलिम्पिक सूवर्ण पदक विजेत्या, बॅडमिंटनमध्ये भारताच्या आयकॉन आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त सानिया नेहवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्या वतीने कविश्वरसिंह राजपूत, संगिताताई चव्हाण, गणेश म्हात्रे यांनी हा पुरस्कार स्विकारला. रोख धनादेश, सोनाटा कंपनीतर्फे पारितोषिक तसेच स्मृतीचिन्ह, मेडल आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इंडियन टॅलेन्ट ऑलिम्पियाडकडून देशभरातील विविध शाळांचे निरिक्षण केले जाते. यात शाळेचे व्यवस्थापन, निकाल, परिपाठ, अभ्यास करून घेण्याची पध्दत, ऑलिम्पियाड परिक्षेत शाळेचा सहभाग आणि खासकरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यासह विविध बाबी तपासल्या जातात. यानंतर संपूर्ण निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्डसाठी निवड करण्यात येते. इंडियन टॅलेन्ट ऑलिम्पियाडच्या दिल्ली आणि मुंबई अशा दोन मुख्यालयी शाळांची निवड प्रक्रिया पार पडते.
यावर्षी देशभरातून ११० शाळा या पुरस्कारासाठी पात्र ठरल्या असून यात बुलढाणा जिल्ह्यातून एकमेव खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात असलेल्या आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दरम्यान शाळेला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रिन्सिपॉल अनिता पळसकर यांचे संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तर हा पुरस्कार केवळ माझा नसून शाळेच्या प्रत्येक सदस्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टांचे हे चिज आहे,
अशी प्रतिक्रीया प्रिन्सिपॉल अनिता पळसकार यांनी दिली आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्ड मिळालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी भविष्यात ऑलिम्पियाडमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळविल्यास असे विद्यार्थी इंडियन टॅलेन्ट ऑलिम्पियाडकडून देण्यात येणाऱ्या रोख पुरस्काराचे मानकरी ठरू शकणार आहेत.