ममताची महामंडलेश्वर होताना….
एक काळ होता, जेव्हा ममता कुलकर्णी हे नाव प्रत्येक चाहत्याच्या ओठांवर होते. तिचं सौंदर्य, तिचं धाडस, आणि तिच्या सिनेमातील बोल्ड दृश्यांनी तिने एक वेगळाच ठसा उमटवला होता. “करण अर्जुन,” “क्रांतिवीर,” “सबसे बड़ा खिलाड़ी” , गँगस्टर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून ती प्रत्येक घराघरात पोहोचली होती. परंतु नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णीने केलेल्या टॉपलेस फोटोशूटने तर बॉलिवूड आणि समाजात खळबळ माजवली होती.
ममता कुलकर्णीची प्रतिमा नेहमीच बोल्ड होती. तिच्या त्या एका टॉपलेस फोटोशूटने तिचं नाव प्रत्येक पेपर, मासिक, आणि गप्पांच्या फडांमध्ये झळकवलं. काहींनी तिला “धाडसी” म्हटलं, तर काहींनी “वादग्रस्त.” पण एक गोष्ट खरी होती—ममता कोणालाही निष्क्रिय ठेवू शकत नव्हती. तिच्या नजरेत एक वेगळं जादू होतं, आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात असलेला आत्मविश्वास प्रत्येकाला मोहून टाकायचा.
तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना ममता अचानक गायब झाली. ना कुठले सिनेमा, ना कुठली मुलाखत. चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. कालांतराने तिचं नाव कुप्रसिद्ध ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत जोडलं गेलं. दुबईतल्या चमकत्या दुनियेत ती आणि विकी एकत्र राहत असल्याचं समजलं. विकी गोस्वामीचं ड्रग्ज व्यापारातील नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
२५ वर्षांनंतर ममता परतली ती मात्र एका वेगळ्या रूपात. मागील महिन्यात जेव्हा मुंबईत दाखल झाली तेव्हा तिने भावनिक पोस्ट केली होती. आज पूर्वीच्या ग्लॅमरस ममताला विसरून, लोकांनी महाकुंभात भगव्या वस्त्रांमध्ये तिला पाहिलं. तिच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ, चेहऱ्यावर शांततेचं वलय, आणि डोळ्यांत एक वेगळा ठाव. ती आता साध्वी ममता कुलकर्णी नव्हे, तर महामंडलेश्वर झाली होती.
एकेकाळी तिचं जीवन ग्लॅमर, पैसा, आणि वादांनी भरलेलं होतं. आज ती अध्यात्माच्या मार्गावर आहे. ती तिच्या अंधाऱ्या भूतकाळाला मागे टाकत, एका नव्या प्रकाशात उभी आहे. ती आता ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे.
– देवनाथ गंडाटे ©