Home Breaking News हिमायतनगर तालुका व शहराच्या विकासाचे राजकीय नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे वाजले तीन तेरा 

हिमायतनगर तालुका व शहराच्या विकासाचे राजकीय नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे वाजले तीन तेरा 

मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने परमेश्वर मंदिर कमानीजवळील वाहतूक अनेक तास ठप्प ….

कोट्ट्यावधी च्या निधीचा विकास झाला कुठे ?

अंगद सुरोशे हिमायतनगर

हिमायतनगर तालुका व शहराच्या विकासासाठी राजकीय नेत्यांनी कोट्यावधींचा निधी आणत विकास केला म्हणत फक्त त्याचे श्रेय घेण्याचे काम आजपर्यंत केले आहे.प्रत्यक्षात मात्र कोणताही विकास तालुक्यात व शहरात झालेला पाहाव्यात मिळत नाही.अनेक कामेही अर्धवट आहेत.नळ योजनेच्या कामासह शहरातून गेलेल्या अर्धवट राष्ट्रीय महामार्ग कामात अभियंता ठेकेदारांकडून झालेली हेराफेरी, राजकीय नेत्यांच्या टक्केवारीच्या हिस्सेदारीमुळे विकास कामात बोगसपणा आल्याने हिमायतनगर शहराच्या विकासाचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे.अशा संतप्त प्रतिक्रिया रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर हिमायतनगर येथील मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा अनेक तास खोळंबा झाल्याने यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी दिल्या आहेत.

रविवारी दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर शहरातील अनेक मुख्य रस्ते बंद झालेले पाहायला मिळाले.हिमायतनगर शहरात प्रवेश करताना लागणारी परमेश्वर मंदिर कमान चक्क पावसाच्या पाण्यामुळे जॅम होऊन तिथे अनेक तास वाहतूक खोळंबली होती.तसेच हिमायतनगर मधून पळसपुर डोलारी व बोरी, ब्राह्मणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या नडव्या नाल्याला मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी आल्यामुळे रस्ता बंद झाला होता. शहरात असणाऱ्या नागरिकांना बाहेर जाता आले नाही व शहराच्या बाहेर असणाऱ्या नागरिकांना शहरांमध्ये प्रवेश करता आला नाही. यामुळे हिमायतनगर तालुकावाशी त्रस्त झाले होते.

हिमायतनगर ग्रामपंचायतला नगरपंचायत च्या दर्जा मिळूनही शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरि सुविधा मिळतील असे वाटले असताना या आशा आता भंग पावल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यासह शहरांमध्ये रविवारी दुपारी दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरात सगळीकडे पाण्याचे तळे साचल्याचे पाहायला मिळाले आहे विशेषता शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी असणारे मुख्य श्री परमेश्वर मंदिर कमानी जवळ गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचून राहिल्याने जवळपास दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.पाण्याचा प्रवाह चालू असतानाही अनेक जण जीवघेण्या पद्धतीने वाहने चालून यातून बाहेर निघताना पाहायला मिळत होते. कमानी जवळील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तसेच हिमायतनगर मधून विदर्भाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नडव्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहू लागल्याने तिथेही दोन तासापेक्षा जास्त वेळ वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिक, शेतकरी अडकून राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. या नडव्याच्या पुलाला मंजुरी मिळाली असल्याचे दरवर्षी बेंबीच्या देटापासून ओरडून सांगणाऱ्या राजकीय नेत्यांनी शहरवासियांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचे काम केले आहे.

हिमायतनगर शहरामध्ये अल्पसा पाऊस झाला तर येतील नाण्यावरून पुराचे पाणी जाऊन मार्ग बंद पडण्याच्या समस्येला सामना नागरिकांना करावा लागतो आहे. यंदा पावसाळ्यातील परतीच्या पावसापर्यंत अनेक वेळा शहरातील चौपाटी,सराफ लाईन, बजरंग चौक,आंबेडकर चौक, पोलीस ठाण्याजवळील बोरगडी चौक, सिरंजणी रस्ता चौक, नडव्याचा पूल, परमेश्वर मंदिर मुख्य प्रवेश कमान व शहरातील अनेक वार्डात या पावसामुळे पाणीच पाणी जमा होऊन अनेकांच्या घरात शिरूल्याने अनेकांची दयनीय अवस्था झालेले चित्र स्पष्ट दिसत होते.

एवढेच नाही तर हिमायतनगर शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराने अंदाजपत्रकाला बगल देत केले.रस्त्याची रुंदी कमी केली पुलाच्या कामात मनमानी केल्याने सांडपाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या नाल्याचे बांधकाम अर्धवट ठेवून मंजूर झालेल्या उड्डाणपूल देखील केला नाही. यासाठी राजकीय नेत्यांनी आपल्या काही हस्तकांना खुश करण्यासाठी रद्द करण्याचा ठराव वरिष्ठ स्तरावर पाठविला परिणामी वाहनाऱ्या पावसाच्या व नाल्याची पाणी जाण्याची वाट थांबली असून पाऊस होताच मुख्य रस्त्यावर थेट पाणी येऊन रस्ते बंद होत आहेत.रविवारी झालेल्या धुवाधार पावसाच्या पाण्याने तासभर रस्ता बंद झाला होता.

या सर्व परिस्थितीतून एवढेच पाहायला मिळते की हिमायतनगर तालुक्यातील राजकीय पुढारी फक्त कोट्यावधींचा विकास काम आणले व केले म्हणून श्रेय घेण्याचेच काम करत आहेत. प्रत्यक्षात विकास मात्र कुठेच दिसत नाही. सगळीकडे फक्त समस्या समस्या दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक कोटींचा विकास काम आणले अश्या वलग्ना करणारे नेते मात्र हिमायतनगर तालुक्यातील जनतेच्या आशांवर विरजण घालत असलेले पाहायला मिळत आहेत.

हिमायतनगर शहराच्या विकास कामांमध्ये झालेली हेराफेरी,राष्ट्रीय महामार्ग कामात संबंधित अभियंता ठेकेदार व टक्केवारीत हिस्सा घेतलेल्या राजकीय नेत्यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेकांनी संताप जनक भावना व्यक्त केली आहे.किमान शहरातील सांडपाणी व पुराच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराने दोन्ही बाजूने नाल्याचे काम तात्काळ करून शहरात उड्डाणपूल करून द्यावा.बोरी रस्त्यावरील नडव्याच्या पूलाचे काम करावे.जेणेकरून वारंवार पाऊस होताच बंद पडणारा शहरातील मार्ग सुरळीत होईल अशी रास्ता अपेक्षाही विकास प्रेमी नागरिकातून व्यक्त केली जात आहे.

Previous articleलहरी पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीन पिक पाण्याखाली