Home Breaking News सिद्धांतवादी राजकीय विचारप्रणालीचा ह्रास!

सिद्धांतवादी राजकीय विचारप्रणालीचा ह्रास!

ॲड.पुजा प्रकाश एन.

B.A LLB, LLM.M. A.( Political Science, Geography, Sociology.) 

भूतलावरील मानवीय वसाहत असणाऱ्या कोणत्याही देशात व देशान्तर्गत असलेल्या राज्यामध्ये विशिष्ट प्रकारची विचारधारा असते,व त्या विचारधारा वरचं तो देश तथा राज्य प्रगतीच्या मैलाचे किती शिखरे पादाक्रांत करेल याची मूल्यांकनात्मक छाननी राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावर होऊन वर्तमान स्थितित व भविष्यात जगाच्या पाठीवर तो देश किती प्रभावशाली असेल याचे अनुमान काढ़ता येते ,असेच अनुमान आपल्या राष्ट्र व राज्याविषयी करावयाचे ठरल्यास महाराष्ट्र हे सर्वचं बाबतीत आघाडीवर असलेलं राज्य आज वैचारिक तत्वाच्या बाबतीत सत्तेच्या सारीपटाच्या खेळामुळे “एंड ऑफ आयडालाॅजी” च्या वाटेवर जाऊन राष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम किती उग्र असतील याची भिती वाटते ,विचारधारावर आधारित पक्षीय राजकारण आज रसातळाला जातांना महाराष्ट्रातील जनता उघड़या डोळयांनी पाहत आहे ,गेल्या कड़ाही दिवसापासुन तर हे अधिक भयानक झालेले आहे, राजकीय सत्तेच्या कुरघोडीच्या खेळात व सत्ताचं सर्वस्व आहे मग ती कोणत्याही मार्गाने प्राप्त झाली पाहीजे या कुजकट मानसिक विचारापायी या देशातील धर्मनिरपेक्ष, धर्मांध,व बहुजन या सर्वचं विचारधारेचा अंत होत आहे याचं भान येथील राजकीय धुरंधर म्हणुन घेणारयांकडे दिसत नाही..

कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस, रिपाइ व इतर फुले-शाहूजी-आंबेडकर विचारांची माणसं एकीकडे तर दुसरीकडे सेना,भाजपा व हिंदुत्ववादी विचारांची माणसं असं गेल्या दोन दशकापुर्वीचं चित्र महाराष्ट्राच्या राजकीय जिवनात असायंच किंबहुना देशातील पुर्वोत्तर दोन,चार राज्ये सोडली तर हेच चित्र राष्ट्रीय राजकारणात देखील दिसायचं ,देशभरात पुरोगामी प्रतिगामी, समाजवादी विचारधारा कार्यरत आहेत व त्या विचाराचा मी पाइक आहे अशा अर्विभावात येथील लोक जीवन जगायचे,हल्ली मात्र विचारधारालाच सुरुंग लागला आहे सत्तेच्या लालसेपायी विचारधारा पोखरण्याचं मोठं पातक येथील राज्यकर्ते म्हणवून घेणारे माणसं करत आहेत,सेना भाजप राष्ट्रवादी कांग्रेस ,आंबेडकर विचारधारा ची काही संघटना घेऊन कार्य करणारी महायुती,तर याचं समान पक्षांना घेऊन सेना ,राष्ट्रवादी कांग्रेस,व काही आंबेडकर विचारधारा असलेल्या संघटनांना कांग्रेस ने निर्माण केलेली महाविकास आघाडी ,राज्यात कार्यरत वंचित बहुजन आघाड़ी व स्वराज्य पक्ष , प्रहार स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची आत्ताची नवी परिवर्तन महाशक्ति आघाडी. अशा या सत्तेच्या सारीपटात नेमकं कोणी कोणत्या विचारधाराचा स्वीकार करुन कुठल्या मार्गावर आरुढ होऊन या राज्याला व देशाला नेमकं कुठल्या वळणावर घेऊन जाणार आहेत हे कळायला मार्ग नाही,

कुठे कोण ते जातय कोण नेमकं कोणत्या विचारधाराचा पाइक आहे समजत नाही परिणामस्वरूप येणारया काळात सर्वपक्षीय सर्वसामान्य मतदार बोअर झाले असतील , किंबहुना आज ही काही प्रमाणात मतदारांची उदासिनता वाढते आहे,हे प्रमाण येणारया काळात वरचढ ठरत गेलं तर ते संविधान व कार्यरत वैचारिक अस्मिता करीता विचारधाराचा अंत ठरेल राज्यशास्त्र विषयात End of Ideology ( विचारधारांचा अंत ) नावाची एक संकल्पना पूर्वीपासून चर्चेत आहे.

डॅनियल बेल नावाच्या विचारवंताने १९६० च्या सुमारास याच नावाचे पुस्तक लिहिले होते. त्याच्या म्हणण्यानुसार तत्कालीन राजकीय विचार कालबाह्य झाला होता. कम्युनिस्ट , सोशॅलिस्ट , नेशनालिस्ट वगैरे राजकीय विचारधारा बाद झाल्या आहेत …. आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनात यातल्या कोणत्याच राजकीय विचारधारा कोणताच फरक पाडू शकत नाहीत . तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीचा वेग यापुढे जीवनमान ठरवेल.

डॅनियल बेल ने त्याच पुस्तकात अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. तो मुद्दा राजकीय क्रांती बद्दल आहे . युरोपात गेली अनेक वर्ष राजकीय विचारांची युद्धे झाली . कम्युनिस्ट , फेसिस्ट इत्यादी राजकीय कारणासाठी रक्तपात झाले. यापुढे अशी युद्धे किंवा देशांतर्गत यादव्या होणार नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे राजकीय गट एकमेकांशी सुसंवाद स्थापन करुन राजकीय सत्ता वाटून घेतील . वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीने लोकांचे जीवनमान जसे उंचावत जाते तसे दंगलखोर फूट सॉल्जर्स बाजारात उपलब्ध राहत नाहीत. त्यांची आवश्यकता उरत नाही.

राजकीय गट आपापसात तडजोडी करुन सत्ता वाटून घेतात आणि राजकारणात – वाटाघाटी डील करणे हेच महत्वाचे बनते. राजकीय विचार अर्थहीन बनतात कारण ज्या काळात ते राजकीय विचार तयार झाले ती परिस्थिती कालबाह्य बनते .

अर्थात भारताला ही थेअरी जशीच्या तशी लागू पडत नाही. पण आपण पुढील काही अंदाज बांधू शकतो .

राम मंदिर , ३७० , समान नागरी कायदा इत्यादी ज्वलंत विषय निकालात काढले तर “ राजकीय हिंदुत्व “ कितीसे आकर्षक राहिल ? काँग्रेस काळात दमन झाल्याने हिंदुत्व फोफावले , मोदी काळ जर १५ वर्ष टिकला तर हिंदुत्वाच्या त्यापुढच्या मागण्या काय असतील ? एकीकडे भाजप पसमंदा ( मागासवर्गीय ) मुस्लिमाना स्वतःकडे खेचतो आहे . दुसरीकडे दोन्ही तिन्ही सेना हिंदुत्व वादी असल्या तरी भाजपच्या दावणीला कायमच्या बांधल्या जाणार नाहीत .

सेक्युलर म्हणून जो काही राजकीय विचार आहे तो पहिल्यापासून खुळचट भाबडेपणा जातीनिहाय सेल, विशिष्ट वर्गाचं बोलघेवडं लांगूलचालनाचा फार्स यावर उभा आहे . पुढच सोडा आजतरी सेक्युलर या राजकीय विचाराला काय अर्थ उरला आहे ?

कम्युनिस्ट, पुरोगामी वगैरे विषयांवर कार्यरत असणाऱ्यांनी सामान्यांच्या जीवनात काय बदल घडवला आहे . भविष्यात त्याला काय अर्थ राहणार आहे ?

पुरोगामी, प्रतिगामी, सेक्युलर नाॅन सेक्युलर, कम्युनिस्ट, अशा भर गच्च शब्द सामर्थ्याने सामान्य जनांच्या जीवनात काडीमात्र ही फरक पडला नाही, उलट दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या यांच प्रमाण दिंवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, व्हाल्टेअरचं लोकशाही तत्व व बेल चा विचार इथे लागु पडतो का? यावर मंथन होणे गरजेचं आहे

डॅनियल बेल चा विचार जसाच्या तसा भारताला लागू पडणार नाही कारण त्याला युरोपियन इतिहासाचे संदर्भ आहेत. पण येत्या दहा वर्षात राजकीय विचारांचा संघर्ष कितीसा शिल्लक उरेल हा एक प्रश्नच आहे . बहुतेक सर्व मुद्द्यावर बहुतेक सर्व गटांचे एकमत होण्याच्या दृष्टीने ही पाऊले पडत आहेत काय ?

राजकारण्याना स्वार्थी भ्रष्ट मानून या घडामोडीकडे एका चष्म्यातून पाहता येते. दुसऱ्या बाजूने पाहिले तर सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात खरा बदल (विज्ञान तंत्रज्ञान ) इंटरनेट ने आणला – कोणत्या राजकीय पक्षाने नव्हे ….. आणि इंटरनेट हा मानवीय मेंदूची निर्मिर्ती आहे, शोध आहे , आणि अशा प्रकारचे शोधाचा अविष्कार करण्यासाठी मेंदूला रचनात्मक दिशेने कार्य प्रवण करावं लागतं थोडक्यात काय तर पुरोगामी, प्रतिगामी च्या फुशारकी च्या तत्वांना तिलांजली देऊन रचनागामी बनावं लागतं, रचनागामी झालो तरचं उद्याच्या भारताच्या पिढयांच भविष्य आपण उज्वल करु शकतो.

रचनागामी बनुया राष्ट्र निर्माणा करीता एकत्र येऊया..

भविष्यातील पिढीसाठी सुख समृद्धिचं युग निर्माण करुया!

Previous articleजलंब माटरगाव शिवार संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान
Next articleहदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील