Home Breaking News वसुंधरा पायींदिंडीचे अर्धापूरमार्गे नांदेड शहरात आगमन!

वसुंधरा पायींदिंडीचे अर्धापूरमार्गे नांदेड शहरात आगमन!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड  दि.२७ सप्टेंबर २०२४

दिनांक १३ सप्टेंबर २०२४, नागपूर येथील श्री क्षेत्र मोहगाव झिल्पी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथे वसलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संप्रदाय,पूर्व विदर्भ उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान १३सप्टेंबर २०२४ रोजी झालेले आहे. या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूर पासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या २१ऑक्टोबर २०२४ रोजी ५९ वा जन्म दिन येत आहे. स्व-स्वरूप संप्रदायाचे मुख्यपीठ नानिजधाम येते हा उत्सव आज अनेक वर्ष साजरा केला जातो त्यादिवशी ही दिंडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.

पूर्व विदर्भ उपपीठ सोबत तेलंगणा उपपीठ, उत्तर महाराष्ट्र (नाशिक ) उपपीठ,मराठवाडा (परभणी) उपपीठ, मुंबई (वसई) या उपपीठाहून देखील अश्याच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत. या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे. ही दिंडी आज दि.२६ सप्टेंबर रोजी ठीक ९ वाजता नांदेड येथे कामठा गुरुद्वारा मार्गे सचखंड गुरुद्वारा येथे दुपारचे जेवण घेऊन सायंकाळी ५ वाजता लोहसाहेब गुरुद्वारा विष्णुपुरी येथे आगमन झाले.व त्यानंतर सायंकाळी ७ वाजता धनगरवाडी येथील साईबाबा मंदिर येथे आगमन झाले. व पाचुकांची पूजा व आरती करण्यात आली , सर्व भाविकांनी पादुका दर्शन घेतले. यावेळी हजारो भाविक पादुका दर्शनासाठी भर पावसात जमले होते. या दिंडीतून, आध्यात्मिक विषयासोबतच सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्यात दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वार्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे. सोबत टॉयलेट व्हेन देखील तैनात आहे, तसेच सोबत पिण्याचे पाणी, आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडी सोबत कायम सज्ज आहेत. विशेष म्हणजे ही दिंडी रस्त्याच्या एका बाजूने शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत, एका तालात आणि लयीत, त्यांच्या समप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे. त्यांच्या वेषभूषा सुद्धा एका रंगसंगती मध्ये आहेत. एक तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली. वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग दुसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडीसह,एक वाखाणण्याजोगी बाब आहे. यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य व चिकाटीही दिसुन येते. या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले, कारण वेळेच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे, सोबत दिंडीमध्ये संस्थानाचे ॲम्बुलन्स चालताना आढळून आले,त्यात एक वैद्यकीय पथकहि सेवा देताना दिसून आले आहे. असेही आगळीवेगळी पायी दिंडी ज्यात मध्यमवयीनच नसून युवा-युवती, महिला-पुरुष असे सर्व वयोगटातील आणि सर्व सामाजिक वर्गातील भाविक दिसून आले. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे अनेक समाज उपयोगी उपक्रम आहेत, महामार्गावरील ॲम्बुलन्स सेवा, मरणोत्तर देहदान गरीब मुलांसाठी CBSC बोर्डाचे शिक्षण,रक्तदान,व्यसनमुक्ती या आणि अशा अनेक उपक्रमासाठी संस्थान नेहमीच ओळखले गेले आहे. त्यांच्या नव्या उपक्रमासाठी देखील विविध स्तरावर याचे कौतुक होत आहे. ही पायींदिंडी शुक्रवारी सकाळी सोनखेड मार्गे लोहा शहराकडे प्रस्थान करेल.

Previous articleसकल ओबीसी समाज संघटनेतर्फे गुरूवारी हिमायतनगर येथे रस्ता रोको.
Next articleअवैध रेती माफीयांच्या त्रासाला कंटाळुन शेतकऱ्यांचे तहसिलदार सह आमदारांना निवेदन