Home Breaking News दिघी येथील शेतमजुराचा मुलगा बनला जिल्हा परिषद शिक्षक

दिघी येथील शेतमजुराचा मुलगा बनला जिल्हा परिषद शिक्षक

सतीश गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही मिळवले यश

हिमायतनगर ( अंगद सुरोशे ) – तालुक्यातील मौजे दिघी येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत हातावर आपलं पोट भरत आपला घर संसार सांभाळणारे शेतमजूर सुभाष गायकवाड यांचे कुटुंब आहे.याच कुटुंबातील सतीश सुभाष गायकवाड यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर यश खेचून आणले आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दिघी या गावात सुभाष गायकवाड हे आपल्या कुटुंबासवे मोलमजुरी करून आपला गुजारा करतात. अत्यंत हलकीच्या परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा सतीश सुभाष गायकवाड यांनी शिक्षक भरती मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.यामुळे गायकवाड कुटुंबाच्या आनंदास पारावार उरला नाही. कारण एवढ्या बिकट परिस्थितीशी सामना करत सतीश ने हे यश त्याच्या जिद्दीने, मेहनतीने खेचून आणले आहे.
सतीश गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा दिघी येथे झाले. तर पाचवी चे शिक्षण त्यांनी चातारी येथे घेतले. यानंतर त्यांनी नवोदय विद्यालय परीक्षेत यश मिळवत पुढील १२ पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय घाटंजी येथे घेतले. त्यांना शिकवण्याची आवडत असल्याने त्यांनी यानंतर डी. एड साठी नागपूर येथे शिक्षण घेतले.यानंतर त्यांनी काही वर्ष शिकवणी वर्ग घेतले. व काही वर्ष संस्थेवर शिकवले. त्यांना घरच्या परिस्थितीची जाण असल्याने काम करत करत शिक्षण घेतले.अत्यंत बिकट परीस्थितीचा सामना करत दिवस काढले. त्यांचे लग्न होऊन दीड वर्ष झाले व त्यांना एक मुलगी देखील झाली आहे. सतीश यांनी मुलीच्या पायगुणाने मला यश मिळाले असे मनोगत व्यक्त केले.
सतीश गायकवाड यांनी त्यांचा लहान भाऊ बालाजी गायकवाड यांना सलून चे काम शिकवून तेथे स्थिरस्थावर केले. मग लहान्या भावाने त्यांना शिक्षणासाठी हवे नको ते सर्व केले.प्रत्येक वेळी अडीअडचणीत मदत केली.तसेच गावाकडे राहणारे त्यांचे चुलते गंगाधर गायकवाड यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले.यामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो. माझ्या सर्व यशाचे श्रेय हे केवळ माझा लहान भाऊ बालाजी व माझे आई वडील यांनाच आहे.असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.
त्यांच्या यशाबद्दल दिघी येथील सर्व गायकवाड परिवार, दिघी येथील शाळेतील शिक्षकवृंद,पत्रकार परमेश्वर गोपतवाड,पत्रकार सोपान बोंपीलवार पत्रकार,गंगाधर गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलन चे जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष विजय वाठोरे सरसमकर, नागेश शिंदे यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

Previous articleहेमंत शिंदे भूमीराजा न्यूज़चे जिल्हा संपादक यांना ” उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार ” मिळाल्या बद्दल गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक च्या वतीने सत्कार
Next article१६९ कुटुंबाच्या बाहेरच्यांनी काय करावे…??