जिल्हा प्रतिनिधी:- योगेश घायवट
बाळापूर येथील पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या खासगी वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा व्याळा दरम्यान घडली. या अपघातात पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांच्यासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्या दोघांवर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर खासगी वाहन उलटल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली आहे. ठाणेदार जुमळे व त्यांचा पोलिस कर्मचारी सोहेल खान हे दोघेही कर्तव्य बजावून बाळापूर येथून सकाळी त्यांच्या एमएच ३०-बिई – १००८ या वाहनाने अकोला येथे जाण्यासाठी निघाले होते.
दरम्यान त्यांची कार राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ पोहचताच कारच्या पुढील डाव्या बाजूचे टायर अचानक फुटले. त्यामुळे जुमळे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन कलाटण्या घेतल्या. व गाडी महामार्गाच्या बाजूला असलेल्या कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
एसपींची रुग्णालयात धाव
पोलीस निरीक्षक जुमळे व पोलिस कर्मचारी खान यांना अकोला येथील डॉ. रावणकार यांच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी रुग्णालय गाठत जखमी पोलिस निरीक्षकांची भेट घेतली व विचारपूस केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहूरे, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांनी सुद्धा भेट घेतली.
पोलीस निरीक्षक:- अनिल जुमळे यांची अपघात झालेली कार