Home Breaking News युती व्हायला पाहिजे होती…!!

युती व्हायला पाहिजे होती…!!

मविआ सोबतं वंचित बहुजन आघाडीची युती व्हायला पाहिजे होती अशी आशा खुप जणांना होती…!!
मविआ सोबतं युती व्हायला पाहिजे होती अशी सर्व संविधानवादी जनतेची इच्छा होती…!!
मविआ सोबतं वंचित बहूजन आघाडीची युती व्हायला पाहिजे होती अशी भाषा खूप लोकांच्या तोंडी आजही आहे…!!
तुमची आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणजेच युती करण्यासाठी मविआ मधील घटक पक्ष तयार होते का.???
या प्रश्नाचं उत्तर नाही असे आहे, कारण मविआ मधील तिन्ही घटक पक्ष आजही एका एका जागेसाठी भांडू लागले आहेत, दिल्लीत जाऊन एकमेकांचे कपडे फाडू लागले आहेत,एकमेकांना धमक्या देऊ लागले आहेत, शिवसेना म्हणते नौटंकी बंद करा नाहीतर ४८ जागेवर परिणाम दाखवून देऊ…!!
कॉंग्रेस म्हणते शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचा धर्म पाळतं नाही, शिवसेनेने सांगली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भिवंडी मध्ये कुणालाही विचारत न घेता उमेदवार परस्पर जाहीर केले आहेत….!!

मविआ मधील जे तीन पक्ष एका एका जागेसाठी भांडतं आहेत ते वंचित बहूजन आघाडीला म्हणजे चौथ्या पक्षाला जागा देतील का.??? उत्तर सरळ आणि सोपे आहे, ४८ ही जागा या तिन्ही पक्षांना कमी पडतं आहेत म्हणून ते इतर पक्षांना आघाडीत सामावून घेऊ शकत नाहीत…!!

मविआ मध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेला आपल्या हक्काची हातकणंगले ही एकच जागा हवी होती ती एक जागा सुद्धा मविआ ने राजू शेट्टी यांना दिली नाही कारण मविआ मधील घटक पक्षांना ४८ जागा कमी पडतं आहेत. मग इतर पक्षांना सामावून घेतले तर जागा कोणत्या देणार ही मुख्य अडचण आहे…!!

मविआ तील तीन्ही घटक पक्षांना आपली गेलेली राजकीय पत आणि अब्रू वाचवायची आहे…!!
त्यासाठी त्यांना अधिकाधीक जागा लढवून आपला पक्ष स्थिरस्थावर करायचा आहे…!!
२०१९ मध्ये कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रात ४८ पैकी केवळ चंद्रपूरची एक जागा मिळाली होती,महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचा जनाधार संपलेला आहे आणि भयभीत नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. ही कॉंग्रेस पक्षासाठी मोठी डोकेदुखी आहे. कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रातून संपतो की काय अशी भिती नेतृत्वाला आहे…!!
अशावेळी संविधान वाचवायचे आहे, लोकशाही वाचवायची आहे अशी आरोळी ठोकून संविधानवादी जनतेच्या मतांवर स्वार होऊन गळती लागलेल्या, संपतं आलेल्या कॉंग्रेस पक्षाला वाचविण्याची धडपड कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला करावी लागत आहे.त्यासाठी कॉंग्रेस एका एका जागेसाठी भांडतं आहे…!!

२५ वर्षे भाजप सोबतं फरपटतं गेलेल्या शिवसेनेचे भाजपने आडवे, ऊभे तुकडे करून शिवसेनेला जेरीस आणले आहे,नव्हे शिवसेना संपवण्याचा संकल्प केला आहे…!!
अशा अडचणीत शिवसेना सापडली आहे.म्हणून २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना जिवंत आहे हे दाखविण्यासाठी अधिकाधिक जागा लढवून चिन्ह, मिळविणे आणि पुर्वी च्या अवस्थेला पोहचण्यासाठी शिवसेना धडपडत आहे,म्हणून शिवसेना एका एका जागेसाठी भांडतं आहे, मरता क्या न करता अशी अवस्था शिवसेनेची आहे…!!

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपने दोन तुकडे करून छोटा हिस्सा शरद पवार यांच्या वाट्याला आला आहे…!!
पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करणे, घड्याळ चिन्ह मिळविणे, आणि जनाधार वाढविणे अशी कसरत शरद पवार यांना करावी लागत आहे.आणि म्हणून शरद पवार एका एका जागेसाठी भांडतं आहेत, अधिकाधिक जागा लढवून गेलेली पत पुन्हा ऊभी करायची आहे…!!

मविआ मधील तीन्ही घटक पक्ष आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत आणि म्हणून त्यांना अधिकाधिक जागा लढवायच्या आहेत, ४८ जागेपैकी तिघांना जागा वाटप करतांना जागा कमी पडतं आहेत हे वास्तव रोजच्या बातम्या वरुन महाराष्ट्रातील जनतेला समजू लागले आहे…!!

तिघांना जागा कमी पडतात मग चौथा आला तर कसे.??? या प्रश्नावर मविआ मधील घटक पक्षांच्या नेत्यांनी थंड डोक्याने ठरविले की, वंचित बहूजन आघाडी हा जनाधार असलेला पक्ष आहे,वंचित बहूजन आघाडी ने २०१९ मध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. वंचित आघाडी संविधानवादी विचारधारेचा पक्ष आहे, या पक्षाला आघाडीत सामावून घेतले नाही तर आपणं बदनाम होऊ म्हणून आघाडी करण्याची नौटंकी सुरू करु, जागा देता येणार नाही अडचण आहे,मात्र मिडिया हाताशी धरुन वंचित बहूजन आघाडीला बदनाम करु अशी योजना आखून , मविआ वाले बैठक न घेता फक्त मिडिया मध्ये बोलतात, दोन देतो, चार देतो, कोणत्या देतो त्या जागेचं नांव नाही…!!

युती करण्यासाठी बैठकीत बसावे लागते ती बैठक होतं नाही, किमान समान कार्यक्रम नाही, काहीच नाही फक्त प्रकाश आंबेडकर हेकेखोर आहेत हे मांडण्यासाठी पत्रकार कामाला लावले, जुने सहकारी कामाला लावले, अर्थतज्ञ कामाला लावले, वंचित बहूजन आघाडीचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करणे एवढा एकच कार्यक्रम धुमधडाक्यात राबविला जातो आहे…!!

” मनात नाही नांदणं अन् कोवाळे बांधणं. ”
असं वर्तन मविआ मधील घटक पक्षांनी सुरू केले.

मुंबई मधील इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण वंचित बहूजन आघाडीला मविआ ने दिले नाही, मात्र वंचित बहूजन आघाडीला बदनाम करण्यासाठी खोटे विधान करुन निमंत्रण दिल्याचा आभास निर्माण केला…!!

कॉंग्रेस पक्षातील नेते उपहासाने म्हणाले होते आमंत्रण द्यायला ही काय सत्य नारायणाची पुजा आहे का.??

मविआ च्या बैठकीत दिडतास वंचित बहूजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षाला बाहेर बसविणे….!!

अपमानास्पद शेरेबाजी करणे, कोणत्याचं प्रकारची चर्चा न करणे असे सगळे प्रयोग करुन मग भिक दिल्यागत एक देतो, दोन देतो, तीन देतो असा पवित्रा घेत, आम्ही देऊ तेवढे घ्या आणि लाचारी पत्करा असा सरंजामी पवित्रा घेतला…!!
पहिल्या दिवसा पासून तर आजपर्यंतचे मविआ मधील घटक पक्षांचे वर्तन पाहिले की, कुणाच्याही लक्षात येते की मविआ ला कोणत्याचं चौथ्या पक्षाला सोबतं घ्यायचे नव्हते…!!

संविधानवादी जनतेच्या मनात आपल्या बद्दल सहानुभूती रहावी म्हणून मविआ मधील घटक पक्ष संविधान वाचवायचे आहे, लोकशाही वाचवायची आहे अशी भुल देणारी भाषा वापरतं आहेत…!!

सरंजामी मानसिकतेचे घराणेशाही वाले मविआ मधील घटक पक्ष आपल्या वाट्याची सत्ता, आपल्या घरातील सत्ता, आपल्या नात्यातील सत्ता वंचित समुहाला देण्यास तयार नाहीत, एकही जागा इकडे तिकडे होऊ नये अशी दक्षता घेणारे सत्तापिपासू वंचित बहूजन समुहाला सत्ता का देतील…???
वंचितांच्या आशा, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा सत्ताधारी वर्गाने पुर्ण कराव्यात हे कसे शक्य आहे..???

वंचित समुहाने परिस्थिती अडचणीची आहे म्हणून दिलेला सत्तेचा तुकडा तेवढा घ्यावा न्याय वाटा मागू नये ही मविआ ची इच्छा आहे…!!

एका एका जागेसाठी आपसात भांडणारे वंचित बहूजन समुहाला सन्मानजनक जागा कसे देतील.??

युती व्हायला पाहिजे होती ही ज्यांची ज्यांची इच्छा होती त्या संविधानवादी जनतेने भाबडेपणा सोडला पाहिजे.राजकारण हे भावनेवर चालतं नाही.तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मविआ मधील घटक पक्ष राजकारण करीत नाहीत. ते त्यांच्या मुलांसाठी,मुलींसाठी,नातवंडासाठी,भावकी साठी, राजकारण करतात…!!

तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटतं असेल तर तुम्ही राजकारण शिकलं पाहिजे, राजकीय प्रगल्भता अंगिकारली पाहिजे, प्रॅक्टिकल झालं पाहिजे. राजकीय आखाड्यातील डावपेच ओळखता आले पाहिजे. राजकीय पक्षांची लबाडीची भाषा, जुमले,फसवणूकीचे फंडे, जुने अनुभव लक्षात घेऊन,मतांसाठी तुमच्या मनात भय निर्माण करणारे षडयंत्र तुम्हाला कळाले पाहिजे. तुमच्या मतांची चोरी करण्यासाठी प्रस्थापित राजकीय वर्गाने आखलेली योजना ओळखण्याची दृष्टि तुम्ही विकसित केली पाहिजे. तुमच्या मताची किंमत तुम्हाला कळली पाहिजे…!!

गरीबी हटाव चा नारा देणाराने गरीबी हटविली नाही हा अनुभव आहे…!!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यानंतर संविधान संशोधन करुन बौद्धांना केंद्रात ४०वर्षे सवलती बंद करणारे सरंजामी आज संविधान वाचविण्याची बुद्धीभेद करणारी भाषा करीत आहेत…!!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये फोटो आणि भारतरत्न किताब ४०वर्षे न देणारे बदमाश आज संविधान वाचविण्याची भुल थाप देतं आहेत हे आपणं लक्षात घेतले पाहिजे…!!

सरंजामी मानसिकतेचे राजकारणी पुढारी आणि राजकीय पक्ष लोकशाही वाचविण्याची भाषा वापरत आहेत ही राजकीय थाप आहे. हाही २०२४ च्या निवडणुकीतील जुमला आहे…!!
मित्रांनो युती व्हायला पाहिजे होती हे तुमचे एकतर्फी प्रेम आहे, सत्ता सुंदरी ला महालातील लोकांनी कैद केले आहे तीला सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, इच्छा व्यक्त करुन, अपेक्षा बाळगून, आशेवर राहून सत्ता सुंदरी मिळणार नाही हे समजून घ्या….!!

जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Previous articleउष्मघातामुळे हिमायतनगर शहरात तरुण युवकाचा मृत्यू…
Next articleसवना येथे सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.