अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट
अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यात आला.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी अकोला शहरातील टाॅवरस्थित वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. टाॅवर चौक, फतेह चौक, खुले नाट्यगृह चौक, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी डाॅ. हर्षवर्धन मालोकार, पक्षाचे शहर अध्यक्ष मजहर अली, बालमुकुंद भिरड, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, बळीराम चिकटे, अमर डिकाव, गजानन दांडगे, सिद्धार्थ सिरसाट, माजी सभापती आकाश शिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते.