Home Breaking News हरवलेले बालपण एक आठवण

हरवलेले बालपण एक आठवण

✍️ जिल्हा संपादक नांदेड

पूर्वीच्या काळी म्हणजे तीस चाळीस वर्षांपूर्वी हंड्यात तापलेल्या पाण्याची अंघोळ न्हाणीतली असायची लाईफबाॅयशिवाय दुसरी कंपनी माहीती नसायची, ok, 501बार साबणाची वडी कपड्यावर घासायची… Moti साबणाचं कौतुक फक्त, दिवाळीला असायचं. शाम्पू कुठला लावताय राव, निरम्यानचं डोकं धुवायचं. दिवाळीच्या एका ड्रेसवर वर्षभर मिरवायचं…

थोरल्याचं कापडं धाकट्यानं, झिजेपर्यंत वापरायचं. चहा चपातीची न्याहरी, उप्पीट, पोहे कौतुकाने असायचे, पार्ले बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार नसायचे. गोल पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं. खर्डा , भाकरी, झुणका पंचपक्वानासारखं लागायचं. गोट्या, विटीदांडू, लपाछपी.

कधी कधी पत्त्यांचाही खेळ रंगायचा. काचाकवड्या, जिबली, नाहीतर, भातुकलीचा डाव मांडायचा. अधून मधून चिंचा, पेरू, आंब्याची झाड शोधायचं. नाहीतर जिभेला रंग चढवत गारेगार चोखायचं. गणगाटाची बैलगाडी, त्याला त्याचाच बैल जुंपायचा… शेंगा चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा. पानं चेचून केलेली मेंहदी हातावर खुलायची…

बाभळीच्या शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची… मनोरंजनासाठी असायची ब्लॅक अँन्ड व्हाईट टि.व्ही. शनिवारी हिंदी आणि रविवारी मराठी मुव्ही. रामायण, महाभारतं शक्तीमानसाठी रविवारची वाट बघायची. चित्रहार, रंगोली, छायागीत यातून सलमान, माधूरी भेटायची…

शाळेला तर नियमित जायचं वायरीचं दप्तर पाठीवर असायचं. उरलेल्या पानांची वही बायडिंग करायची… निम्म्या किंमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला असायची… घासातला घास शेअर करत डबे सगळ्यांच संपवायचे… बाॅटल कुठली राव… टाकीच्या नळाला तोंड लावून पाणि प्यायचं… जमेल तेवढं करत होतो, टेन्शन काय नसायचं… कारण, नुसतं पास झालो तरी आई-बाप खूष असायचं…

पावसाळा आला की पोत्याची गुंची करायची… चिखलातनं वाट काढताना स्लिपर त्यात रूतायची… एकमेकांच हात पकडून मुख्य रस्त्यानच निघायचो… रिक्षा, स्कूल बस नसली तरी घरी व्यवस्थित पोहचायचो.

दिवसभर हुंदडून पेंगत पेंगत जेवायचं एकाच अंथरूनावर ओळीनं सगळ्यांनी निजायचं… वाकळंतल्या ऊबीत झोप मस्त लागायची.. दिवसभराची मस्ती रात्री स्वप्नात दिसायची… दिवस पुन्हा उजडायचा नवी मजामस्ती घेऊन… रात्रीच्या अंधाराला तिथेच मा गे ठेवून…

संस्मरणीय आठवणी… बालपणीचा काळ आठवला…

आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं हे शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा… मग तो दोऱ्याचा असो, किंवा स्वत:च्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही. माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखाला काटे असतात असे नाही, तर सुखाचे काटेही असतात, जे आपल्यावर जळणाऱ्यांना टोचत असतात.

Previous articleआरोग्य शिबिर थांबवल्यामुळे हजारो रुग्ण उपचारापासून वंचित ……महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील
Next articleदिग्रस बु येथे भव्यदिव्य यात्रा मोहत्सव संपन्न