Home Breaking News खामगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनी विविध पुरस्कारांचे वितरण..

खामगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनी विविध पुरस्कारांचे वितरण..

खामगाव रत्न अनिल नावंदर तर खामगाव गौरव विदर्भ शिक्षण मंडळ (गो. से. महाविद्यालय) ला जाहीर
खामगाव -(अजयसिंह राजपूत) खामगाव प्रेस क्लबच्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा खामगाव रत्न पुरस्कार यंदा अनिल नावंदर यांना तर खामगाव गौरव हा पुरस्कार विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ (गो. से. महाविद्यालय) ला जाहीर करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी २०२४ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव प्रेस क्लब खामगाव कडून शहराचा नावलौकीक वाढविणाऱ्या व्यक्तीचा खामगाव रत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. तसेच शहरात व ग्रामीण भागात समाजसेवेचा वसा घेवून जी संस्था निस्वार्थ सेवाकार्य करते अशा संस्थेला खामगाव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोबतच पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवास स्व.बाळासाहेब बिन्नीवाले व युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी खामगाव रत्न या पुरस्कारासाठी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, खामगाव शहराचे नाव राज्य पातळीवर पोहचविणारे महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे मानद सचिव अनिल नावंदर यांचे नाव पत्रकारांच्या वतीने सर्वानुमते ठरविण्यात आले असुन खामगाव रत्न पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. सोबतच शैक्षणिक क्षेत्रासह सांस्कृतीक, क्रिडा, सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ (गो. से. महाविद्यालय) ला खामगाव गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
स्थानिक पत्रकार भवन येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यावेळी खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी शहरातील सर्व पत्रकार बांधव, प्रतिष्ठीत नागरिक, मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleविश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
Next articleनरसी येथील ओबीसी एल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे….. ओबीसी नेते अँड. सचिन नाईक