Home Breaking News अजितदादा गटातील अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, बंद दाराआड कशावर चर्चा?

अजितदादा गटातील अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, बंद दाराआड कशावर चर्चा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले.

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

अकोला : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ‘कॉफी पे चर्चा’नंतर अजित पवार गटाच्या आमदारासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड ‘चाय पे चर्चा’ झाली. अजित पवार यांच्यासोबत असलेले विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांची आज भेट झाली. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळी दहा वाजता अकोल्यातील बाळासाहेबांच्या ‘यशवंत’ निवासस्थानी ही भेट झाली आहे.

चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली होती. यावर विविध नेते प्रतिक्रिया देत होते. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार मिटकरी आंबेडकर यांच्या भेटीला गेले. तब्बल ३० मिनिटांहून अधिक काळ दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाहीये, पण यासंदर्भात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होतेय. शरद पवार आणि आंबेडकर यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला विशेष महत्व दिलं जात आहे.

दरम्यान या बंद दाराआड भेटी संदर्भात मिटकरींना विचारले असता ही कुठल्याही प्रकारची बंद द्वार आणि राजकीय भेट नव्हती. धम्म चक्र परिवर्तन दिन आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेबांना सलग पाच वर्षापासून त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी येत असतो आणि यंदाही आलो आहे. राजकीय दृष्टिकोनातून हे भेट नसून सामाजिक दृष्टिकोनातून ही भेट असल्याचं आपण समजावं, याशिवाय साहेबांना पुस्तक भेट दिली होती त्यावरही चर्चा झाली, असेही मिटकरी म्हणाले.
शरद पवार आणि आंबेडकर यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला विशेष महत्त्व ठरणार आहे का? यावर त्यांना विचारले असता, ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी प्रबंधाला शंभर वर्ष पूर्ण झाली असून या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी कॉफी घेण्याची विनंती केली. त्या विनंतीवरुन शरद पवार आणि बाळासाहेबांसह दहा ते बारा जणांनी कॉफी घेतली. पण त्या कॉफीच्या भेटीचा आणि माझ्या आजच्या भेटीचा दूरदूरपर्यंत कुठलाही संबध नाहीये.
राहिला प्रश्न भेटीचा. ही भेट फक्त सामाजिक दृष्टिकोनातूनच होती, कारण मी राजकीय नेता पदाधिकारी म्हणून कधीच बाळासाहेबांना भेटत नाहीये. बाबासाहेबांचे वारस, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस उदयनराजे महाराज या दोघांनाही नेहमी आदरतेने भेट असतो. त्यात बाळासाहेबांसोबत चर्चा करताना राजकीय चर्चा करावी तितका मी मोठा माणूस नाहीये, कारण त्यांचा राजकीय व्यासंग फार मोठा आहे, आजची भेट फक्त सदिच्छा भेट होती, धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना भेटलो, असेही ते म्हणाले.
या भेटी संदर्भात पत्रकारांनी आंबेडकरांना विचारले असता, ते बोलले की ही भेट विजयादशमी निमित्त होती, विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्या देण्यासाठी मिटकरी आले होते, विशेष म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी आले असतानाही तुम्ही त्याला राजकीय भेट देत असाल तर हे दुर्दैवी आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Previous articleअखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी डॉक्टर असलम खान यांची नियुक्ती!
Next articleप्रकाश आंबेडकरांनी जन्माला घातलेला ‘अकोला पॅटर्न’ काय? धम्म मेळाव्याचा असा आहे इतिहास