पुणे – 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या मुळाशी जाऊन त्यामागील हेतू व त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना दोषी ठरविण्यात यावे. तसेच शासकीय यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी व भविष्यात कुठेही अशा घटना घडू नयेत,याकरिता ठोस शिफारशी व कारवाई करण्याची मागणी करणारे प्रतिज्ञापत्र बाळासाहेब आंबेडकर यांनी आज भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर दाखल केले.
भीमा कोरेगाव कोरेगाव हल्ल्या मागील तत्कालिन परिस्थिती, त्यातून हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत निर्माण केलेला संभ्रम ई. बाबी सविस्तरपणे विषद करून या दंगलीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या प्रतिज्ञापत्रात केली.
तसेच ही दंगल रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांनीं योग्य प्रकारे काम न केल्याने दंगल भडकली, म्हणून त्यांच्यावरील जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली.
याशिवाय खालील मुद्द्यांकडे बाळासाहेब आंबेडकरांनी आयोगाचे लक्ष वेधले.
▪️मिलिंद एकबोटे यांना अटक झाली.संभाजी भिडे यांना अटक का नाही ?
▪️न्या. पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एल्गार परिषदेला शहरी नक्षलवादी असे का संबोधण्यात आले ?
▪️गुप्तचर यंत्रणांनी दंगल रोखण्यासाठी काय कारवाई केली ?
▪️मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे CDR तपासावे.
▪️तत्कालिन मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलिस अधिक्षक पुणे (ग्रामीण), पोलिस कमिशनर पुणे यांना साक्षीला बोलाविण्यात यावे.
ई. महत्वाच्या बाबी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या आहेत. पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.