Home कृषीजागर नवे जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

नवे जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी भूमीराजा 

अकोला: नवे जिल्हाधिकारी म्हणून पद सांभाळताच जिल्हाधिकारी अजित कुंभार मंगळवारी दुपारी थेट बांधावर पोहोचले. जिल्ह्यातील बाळपूर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देवून शेतीसह पीक नुकसानीची पाहणी केली. यासोबतच ग्रामस्थांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. नवे जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले. तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात घरांसह शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पदाचा पद्भार सांभाळताच जिल्हाधिकारी नुकसान झालेल्या भागातील शेतीच्या बांधावर पोहोचले.

बाळापूर तालुक्यातील रिधोरा, निमकर्दा, उरळ आदी गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि जोरदार पाऊस व नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात शेतीचे झालेले नुकसान आणि पीक नुकसानाची पाहणी त्यांनी केली. अतिवृष्टीच्या तडाख्यात निमकर्दा येथील पुलाचे झालेले नुकसान व विविध गावांतील शेतीच्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी बाळापूरचे तहसीलदार राहूल तायडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुषंगाने नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे सांगत, नुकसानीची सविस्तर नोंद घेवून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देशही जिल्हाधिकारी कुंभार यांनी यावेळी दिले.

Previous article*हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त नियोजन बैठक संपन्न*
Next articleविद्यार्थ्यांने अभ्यासाची जिद्द बाळगावी..