अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगाव – राज्यात गेल्या काही महिन्यांपासून फोडा फोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार पक्ष बदलू लागले आहेत. त्यामुळे विश्वास तरी कोणावर ठेवावा, आपल्या मताला किंमत आहे की नाही अशी स्थिती मतदारांची झाली आहे. राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून लोकांमध्ये धुमसत असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांनी व्यक्त केला संताप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दिनांक 10 जुलै रोजी खामगाव येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर यांच्या नेतृत्वात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून टॉवर चौकात उभारलेल्या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपल्या संताप व्यक्त करीत राजकारणाचा निषेध व्यक्त केला. यावेळी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर लगर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, अध्यक्ष आनंद गायगोळ ,शहर उपाध्यक्ष आकाश पाटील, शहर उपाध्यक्ष डॉ. अभिजीत महानकर, मनोविसेचे प्रतीक लोखंडकार, सागर बावस्कर, महेश भारती,सागर भोपळे, निलेश श्रीनाथ, दीपक वानखडे, मनोज लांडगे, गोपाल चरखे, सागर हरसुले, लखन खूपसे, निलेश सोनोने,आकाश खूपसे, विनोद पाटील, विकी शिंदे, हट्टेल, महाशब्दे,यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्राला राज ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही – विठ्ठल लोखंडकार
राज्यातील फोडफोडीच्या राजकारण व लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार पक्ष बदलू लागल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याप्रती मोठा असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसह जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करून हे नेते राजकारणात मश्गूल आहेत. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जण मृत्युमुखी पडले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकीकडे मृतकांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत असे सांगतात तर दुसऱ्या दिवशी मृतकांच्या पार्थिवावर बुलढाण्यात अंत्यविधी सुरू असताना दुसरीकडे मुंबई येथे मात्र शपथविधी सुरू होता. या सरकार प्रति राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात मोठा संतोष निर्माण झाला आहे. एक सही संतापाची ही मनसेची नाही तर लोकांची मोहीम असून लोकांना राग व्यक्त करण्याची संधी मनसेने उपलब्ध करून दिल्याचे सांगत महाराष्ट्राला राजसाहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही असे विठ्ठल लोखंडकार यांनी यावेळी सांगितले.