जिल्हा संपादक नांदेड दिनांक-12 जुन 2023
मानवी जीवनात नात्यांची वीण खूप घट्ट असते. ही नाती सांभाळून जीवनप्रवासात पुढे वाटचाल करावयाची असते. या वाटचालीसाठी अनेकांना विविध नात्यांची सोबत लाभते. आई-वडिल, बहिण-भाऊ, नातेवाईक, गुरुवर्य, मित्र असे नातेसंबंध बहरत जातात. ही सर्व नाती टिकविण्यासाठी संवादाची अत्यंत गरज असते. प्रत्येक नात्यातील संवाद हा वेगवेगळ्या अंगाने घडत असतो. आजकाल धावपळीच्या जीवनात अनेकांना इच्छा असूनही संवादी होता येत नाही. घरातील आई-वडिलांचे संवाद मुला-मुलींसोबत होत नाहीत. आठवड्यातून कधीतरी सुटीच्या दिवशी आपसात बोलणे होते. त्यातही फक्त ख्यालीखुशाली विचारली जाते. वृद्ध आई-वडिलांचे कान तर मुलांचे बोलणे ऐकण्यासाठीच असतात. मात्र अपवाद वगळता अनेकांना संवादाचा आनंद घेता येत नाही. पूर्वी संयुक्त कुटुंबपद्धती होती. त्यात संवाद मुक्तपणे होत असे. परंतु आता फ्लॅट संस्कृतीच्या जमान्यात संवादही फ्लॅट झाले आहेत. गावखेड्यातील पारावर रंगणारे संवाद आपुलकी साधणारे असत. त्यामध्ये आबालवृद्ध, महिला- पुरूष असा भेदभाव नसे. कैक खाजगी गोष्टी पारावर उघड होत असत. प्रसंगी अनेकांना खजीलही व्हावे लागत असे पण थट्टामस्करीने सर्व निभावून जात होते.
मैत्रीचे नाते हे खूपच वेगळे व हवेहवेसे वाटणारे असते. वयोगटानुसार होणाऱ्या मैत्रीचा संवाद देखील तितकाच सुखद असतो. माझ्या एका मित्राने माझा अमूल्य वेळ वाया जातो म्हणून सोशल मीडियावर मला टाळायचे ठरवले. पूर्वी सतत होणारा संवाद अचानक खंडीत झाल्याने थोडी विमनस्क अवस्था झाली. आपला मित्र आपल्याला का टाळतो? असा प्रश्न पडला. मात्र नंतर कळले की त्याची आपल्याबद्दलची सहानुभूती वेगळी आहे. खरंच माझा वेळ सत्कारणी लागावा हिच त्याची प्रामाणिक सदिच्छा होती. खरोखरच संवाद हा नात्यांचा श्वासच आहे. मात्र हे कळत असूनही काही लोक तो साधत नाहीत. अनेकदा भौतिक, सामाजिक परिस्थिती आडवी येते. काहींना गर्व, अहंकार नडतो. त्यामुळेही सुसंवाद साधला जात नाही. अलीकडे कुटुंबातील वाद, कार्यालयात घडणारे वाद, राजकीय पक्षात होणारे वाद मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे संवाद हिरावून त्याची जागा विसंवादाने घेतली आहे. संतमहात्म्यांनी सुद्धा संवाद व शब्दांचा योग्य वापर करून जग जिंकण्याची कला शिकवली आहे. तुकोबांनी तर ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने,’ असा शब्दप्रपंच मांडून शब्दची ‘आमुच्या ‘जिवाचे जीवन’ असे सार्थ वर्णन केले आहे. स्वस्थ संवादासाठी कोणालाही न दुखावणारे शब्द वापरून जीवनाचे “जयगीत” गाता येईल. जगतांना जसा श्वास महत्त्वाचा आहे तसाच तो नात्यांसाठीही आवश्यक आहे.
✍️✍️ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
मोबाईल -9763126313