अकोल्याती त्या मुलीचे पालक मुंबईत पोहोचले. लेकीचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. वसतिगृह अधीक्षक महिलेवर त्यांनी गंभीर आरोप केले
अकोला : मुंबई येथे शिक्षणासाठी गेलेल्या अकोला येथील विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना वसतिगृहातील सुरक्षारक्षकाची भीती वाटत असल्याचे सांगितले होते. वडिलांनी वसतिगृह अधीक्षकांना सांग असे तिला सांगितले होते; मात्र तिने हिंमत केली नाही. गुरुवारी, ८ जून रोजी ती मुंबईहून अकोल्याला परत येणार होती. तिने रेल्वेचे आरक्षणसुद्धा केले होते. घरी आल्यावर आई-वडील तिच्याशी बोलून यावर तोडगा काढणार होते. मात्र त्यापूर्वीच तिची हत्या झाली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलीचे आईवडील अकोल्यातून मुंबईला रवाना झाले. बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. सर्वसाधारण कुटुंबातील ही मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी मुंबईत गेली होती.
वसतिगृहात जायला मुलीचा बाप म्हणून आपल्याला परवानगी नाकारणाऱ्या वसतिगृह अधीक्षक महिलेला या सुरक्षारक्षकाचे प्रताप कसे कळले नाहीत,’ असा प्रश्न मुलीच्या वडिलांनी केला आहे. या विद्यार्थिनीने घरच्यांना व मैत्रिणींना माहिती दिली होती. असे असताना संबंधित अधीक्षक काय करीत होते हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या अधिकाऱ्यांना आरोपी करीत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थिनीच्या घरच्यांनी घेतल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांची समजूत काढणे सुरू होते.
वसतिगृहाचा ढिसाळ कारभार
ओमप्रकाश कनोजिया हा माझ्या मुलीला वारंवार मानसिक त्रास देत होता. ही बाब आम्ही वॉर्डनच्या लक्षात आणून दिली होती. मात्र, त्याच्या वागणुकीत सुधारणा होईल, असे सांगण्यात आले. सोमवारी देखील तिने आमच्याकडे तक्रार केली होती. मात्र दोन दिवसांनी ती अकोल्याला येणार असल्याने आम्हीच तिला, दरवाजा बंद करून राहा, असे सांगितले होते. पण त्या दिवशी नको ते घडले, असे सांगत, यासाठी वसतिगृहाचा ढिसाळपणा कारणीभूत आहे, असा आरोप या मुलीचे वडील आणि भाऊ यांनी केला आहे. वॉर्डन आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी राज्यातील विरोधी पक्षांनी राज्य सरकारला देखील धारेवर धरल्याचं दिसून आलं.