Home Breaking News पतीचं डोकं होतं शंकासदनी;एकाला पाठवलं यमसदनी…

पतीचं डोकं होतं शंकासदनी;एकाला पाठवलं यमसदनी…

अकोल्यातून गोळीबार आणि खूनाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पतीच्या डोक्यात सुरू असलेल्या संशयाने संपूर्ण शहर हादरलं आहे. अनैतिक संबंधातून एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

योगेश घायवट:- अकोला जिल्हा प्रतिनिधी भूमीराजा

अकोला : आजकाल कुणी कुणावर संशय घेईल सांगता येत नाही. अशात डोक्यात घुसलेला संशय तो कुठल्याही स्तराला जातो. असंच काहीसं अकोला जिल्ह्यात घडलं आहे. इथे एका व्यक्तीनं पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरव्हा गावात ही घटना घडली. दरम्यान, भुरेलाल लालसिंग चोंगळ (वय ३५) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून अंतरसिंग भावरा मोरी (वय ३५) असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पत्नी बरोबर अनैतिक संबध आहेत या संशयावरून अंतरसिंगनं देशी कट्टयातून भुरेलालच्या छातीवर दोन गोळ्या झाडून हत्या केली आहे.

काय आहे संपूर्ण घटना?
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातल्या बोरव्हा गावात काल रविवारी रात्री उशिरा एका व्यक्तीवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या माहितीनंतर लागलीच घटनास्थळी हिवरखेड पोलिसांनी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासण्यासाठी पाठवून दिला होता. या दरम्यान भुरेलाल लालसिंग चोंगळ (वय ३५) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याच समोर आलं

या घटनेचा अधिक तपास केला असता पोलिसांना गावातीलच अंतरसिंग नावाच्या व्यक्तीने भुरेलालची हत्या केल्या असल्याचं उघड झालं. या घटनेसंदर्भात हिवरखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी अंतरसिंग हा घटनेपासून फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय…
मृतक भूरेलाल अन् अंतरसिंग भावरा मोरी (वय ३५) हे दोघेही मूळ बोरव्हा गावातीलच रहिवासी आहे. अंतरसिंग याला मृत भूरेलाल याचे पत्नीबरोबर अनैतिक संबध असल्याचा संशय होता. संशयामुळे त्याने काल रात्री साडेदहा वाजता देशी कट्ट्यातून भुरेलाल याच्या छातीवर दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत भुरेलाल गंभीर जखमी झाला असून घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सहायक पोलीस निरिक्षक विजय चव्हाण हे या प्रकरणी तपास करत आहेत.

Previous articleअहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री चौंड़ीत येणार
Next articleअकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू