पत्रकार बांधवांची अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगाव – पत्रकारांसोबत अरेरावीची भाषा वापरून धमकाविणाऱ्या तसेच गैरवर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांच्यावर पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी आज दि. 5 मे रोजी खामगाव येथील पत्रकार बांधवांचे वतीने अतिरिक्त जिल्हा परिषद अधीक्षक यांच्याकडे डीवायएसपी अमोल कोळी यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
निवेदनामध्ये नमूद आहे की, नांदुरा येथे ३० एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दैनिक मातृभूमीचे पत्रकार अमर रमेश पाटील हे इतर पत्रकारांसोबत बातमीकरीता मतदानाची आकडेवारी मिळविण्यासाठी मतदान केंद्राच्या आवारात गेले होते. यावेळी तेथे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांनी पत्रकार अमर पाटील यांच्या सोबत अरेरावीची भाषा वापरून हातातील दांड्याचा धाक दाखवत तेथून निघून जाण्याचे सांगितले. दरम्यान पत्रकार अमर पाटील यांनी मी पत्रकार आहे असे सांगून बातमी संकलनासाठी आलो असल्याचे सांगताच तु जास्त बोलू नकोस, तू लवकर निघ इथून, तू तुया घरचा, माझे डोकं खराब करू नकोस असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली. सोबतच दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद गावंडे, दैनिक खोज मास्टर चे प्रतिनिधी शुभम ढवळे यांना सुद्धा लोटपात केली. तसेच सायंकाळी मतमोजणी केंद्रामध्ये जाण्यापासून सुध्दा स्वप्निल रणखांब यांनी पत्रकारांना अडवणूक करून जाण्यास मज्जाव केला तसेच पत्रकारासोबत अरेरावीची भाषा वापरून अरे तुरे करत अपमान केला. त्यांचे वक्तव्य बेजबाबदार व बेकायदेशीर असून एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकाराला धमकावून अरेरावीची भाषा वापरणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे. याचा आम्ही सर्व पत्रकार जाहीर निषेध करतो. तसेच स्वप्नील रणखांब हे भ्रष्ट अधिकारी असून यापूर्वी १ एप्रिल २०२१ रोजी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेतांना पकडले होते व त्यांचेवर कारवाई झाली होती. तरी असा अधिकारी हा समाजासाठी घातक असून पोलिसांची प्रतिमा समाजात मलिन करण्याचे काम अशा अधिकाऱ्यांकडून वारंवार होते. तरी पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही आपणास विनंती करतो की पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांची पार्श्वभूमी व आताचे गैरवर्तन लक्षात घेता त्यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
तसेच २ मे रोजी रात्री ११ वाजता पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांनी पत्रकार अमर रमेश पाटील यांच्याविरूध्द नांदुरा पोस्टेला खोटी तक्रार देवून पत्रकार अमर पाटील यांच्यावर दबाव टाकण्याचे काम करून अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्यामुळे हा खोटा गुन्हा सुध्दा खारीज करावा, ही विनंती. अन्यथा नाईलाजाने पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना पत्रकार किशोर आप्पा भोसले, जगदीश शेठ अग्रवाल, किरण मोरे, मुबारक खान, अनुप गवळी, आनंद गायगोळ, कुणाल देशपांडे, धनंजय वाजपे, योगेश हजारे, शिवाजी भोसले, महेंद्र बनसोड, आकाश पाटील, मोनू शर्मा, विनोद भोकरे, सुनील गुळवे, गणेश पानझाडे, सिध्दांत उंबरकार यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते.