योगेश घायवट तालुका प्रतिनिधी
अकोला : पाणीटंचाईमूळ राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागतं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा हे गाव. गावात एक विहीर अन् धरण असून ह्या विहिरीला पाणी नाहीये. त्यामुळं गावकऱ्यांना नदी काठावर खड्डा खोदून झिऱ्यातील पाणी प्यावं लागतंय. आज या गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. कारण इथं आजही हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या पात्रात तब्बल ३ ते ४ फूट खड्डा खोदला जातोय. या झिऱ्यातून पिण्याचे पाणी काढावे लागत असून पायी १ किमी गावापर्यत न्यावं लागतंय. कवठा गावातील मन नदीपात्रात हा प्रकार गेल्या पंचवीस वर्षापासून सूरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पाणी समस्येमुळे गावात आज तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. ज्या तरुणांना मुली दिल्या जातात त्यांच्यासमोर मुलींच्या कुटुंबीयांकडून अटीशर्ती ठेवल्या जातात. म्हणजेच मुलीला नदीवर पाण्यासाठी पाठवायचं नाही, तरच मुलगी देणार अशी मुलीच्या पालकांची अट असते.
अकोला जिल्ह्यातील कवठा गावकऱ्यांचा दिवस उगवतो अन् मावळतो नदीच्या काठावर. कारण अजूनही हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना मन नदीच्या पात्रात ३ ते ४ फूट खड्डा खोदून झिरे तयार करावे लागत आहे. अन् या झिऱ्यात तब्बल १५ ते २५ मिनीटानं पिण्यायोग्य पाणी जमा होतं. जमा झालेलं पाणी छोट्या भांड्याने काढलं जातं.
सकाळी लवकर उठून शेतमजूर शेतात जाऊन काम करतोय. घरी परतल्यावर ‘भर उन्हाळ्यात’ ‘रखरखत्या ऊन्हात’ नागरिकांना पाय भाजत नदीवरून पाणी आणावे लागते. तब्बल १ किमी पेक्षा जास्त पायी चालत परत वर चढावे लागते. त्यामुळे कवठा येथील नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. अंदाजे गेल्या २५ वर्षांपासून ही समस्या या ‘कवठा’ गावाला आहे. गावामधून जाणाऱ्या नदीवर बॅरेज (धरण) बांधण्यात आला आहे. आणि गावामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्रात विहिर सुद्धा करण्यात आली. मात्र विहिरी जवळ गावातील सांडपाणी जाते. आणि गावातील पाण्याची टाकीसुद्धा स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे गावकरी विहिरीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करत नाहीत.