अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव
खामगाव: ९ एप्रिल रोजी आलेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळामुळे खामगाव तालुक्यातील संभापूर, हिंगणा उमरा लासुरा येथील शेतकऱ्यांचे नगदी पीक भुईसपाट झाले. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी सरपंच ज्योती पवार यांनी ९ एप्रिल रोजी क्रुषीमंत्री व खासदार प्रतापराव जाधव यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, ९ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे खामगाव तालुक्यातील संभापूर हिंगणा उमरा लासुरा शेंन्द्री या गावातील शेतकर्यांच्या शेतातील गहू, कांदा, हरभरा,केळी,निंबू, भाजीपाला, व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून पिके खराब झाली आहेत. झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी सरपंच ज्योती पवार, उपसरपंच दांडगे, गजानन गावंडे, विलास पवार, सचिन पवार आदी शेतकरी उपस्थित होते.