Home Breaking News वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे कांदा,गहु, हरभरा,व केळीचे अतोनात नुकसान : मदतीची अपेक्षा.

वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे कांदा,गहु, हरभरा,व केळीचे अतोनात नुकसान : मदतीची अपेक्षा.

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा चिंतेत.

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

संभापूर: वीजांचा कडकडाटाबरोबर झालेला पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातील संभापूर येथील केळींच्या बागा, गहु, हरभरा, कांदा, भुईसपाट झाला आहे.दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा चिंतेत होता. त्यात अचानकपणे वेगाचा वारा अन् वीजांचा कडकडाट होवून गारपिटीसह पावसाने हजेरी लावली.संभापूर, हिंगणा, उमरा, लासुरा,पळशी परिसरात गारपीटसह पावसाने पिकांचे नुकसान केले. वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या, तर कापणी केलेला गहु त्याचबरोबर काढलेला हरभरा पावसाने भिजला. गहु, ज्वारी,मका पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे वीजेचे पोल आडवे झाले.कापणी केलेला गहू, हरभरा झाकून ठेवलेल्या फाऱ्या, ताडपत्र्या वाऱ्याबरोबर उडून गेल्या. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. वीजांचा कडकडाट अन् पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांकडून कापलेल्या हरभरा,गव्हाची सुडी झाकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने जीव धोक्यात घालून केलेले शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पाऊस अन् गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खामगाव तालुक्यातील बहुतांश गावात अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अन् वेगाच्या वाऱ्याने शेतकऱ्यांसह सामान्यांचीही धांदल उडाली.

Previous article*🌸जगणं कोणासाठी🍀*
Next articleपंचनामे करुन नुकसानग्रस्त‎ शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या‎: सरपंच ज्योती पवार