लयी जीव कासाविला
दारिद्रयानं वं घेरला
माह्या फाटक्या संसारा
धागा नाही वं भेटला…।।
झाली सय संध्याकाय
दिस काळोखात गेला
माह्या कोकराचा बैना
जीव भुकेलेला झाला…।।
राघू फिरे दारोदारी
पैसा मिळेना हाताले
माह्या चिमुकल्या पोरा
काय नेऊ मी खायाले…।।
भुकेलेला मावा गण्या
ना पोटाले भाकरं
आसवांचे झाले पाणी
बोलाची हो साखरं…।।
राघू दिनवानी मना
मैना फिरे रानोवना
माह्या कष्टी झाला जीव
त्याले मरण येईना…।।
कसा आला रे हा काळ
आली मरणाची वेळ
देवा माह्या परमेश्वरा
कर तुच रे सांभाळ…।।
सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३