अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या लढ्याला यश..!
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगाव:-युवाशक्ती ग्रामविकास संगठन कडून ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनात सुबत्ता आणण्यासाठी शासनाच्या सर्वच विभागात बायोमेट्रिक हजेरी कार्यान्वित केली आहे. ज्या शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीचा उपयोग केला, अशा कार्यालयात कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहिल्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश आले आहे. मात्र, ज्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी नाही, अशा कार्यालयात कर्मचाऱ्यांवर कुणाचा अंकुश नसल्याने येथील विकास रखडला आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक कार्यालयीन वेळेत कधीच उपस्थित राहत नाहीत, तर कित्येक गावांमध्ये हे कर्मचारी ५ ते ७ दिवसानंतर एखाद्या वेळेस कार्यालयात येतात तर काही दुर्गम भागात ते महिना महिना कार्यालयात येत नाही.
राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन राहावे, तसेच, कर्मचान्यांनी वेळेत उपस्थित
राहून आपली जबाबदारी चोख पार पाडावी, असे असताना काही गावात ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नव्हत्या, म्हणून डिसेंबर २०११ पासून युवाशक्ती ग्रामविकास संगठन कडून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा संघटनेच्या वतीने शासन दरबारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी अनेक निवेदन देण्यात आले व त्याबद्दल गेल्या वर्षभरात वारंवार त्याचा पाठपुरावा करण्यात आला.
अखेर ०५ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या मागणीला मान देऊन ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकान्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला व शासनाकडून विभागीय आयुक्तांना याबाबत पत्र पाठवण्यात आले.
ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणारी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ही गावच्या विकासासाठी वरदान ठरणारी असून, गावचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याची गरज निर्माण झाली होती. अखेर शासनाकडून विभागीय आयुक्तांना याबाबत पत्र पाठवण्यात आल्याने आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक प्रणालीला सामोरे जावे लागणार आहे.आता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लागू होणार असल्याने नागरिकांच्या समस्या सुटणार असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, पशुधन दवाखान्यातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनाही बायोमेट्रिक हजेरी लागू करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही शासनाचे आभार मानतो.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक गावपातळीवर हजर राहत नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दिनांक ३१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयाची वेळ ही सकाळी ९.४५. ते सायं. ६.०० पर्यंत असते परंतु अनेक वेळा संबंधित शासकीय कर्मचारी हे वेळेच्या आत परस्पर निघून जात असतात.ग्रामसेवकांच्या अशा वागण्यामुळे ग्रामिण भागातील जनतेला याचा खूपच त्रास सहन करावा लागत होता व त्यांची वेळ सुध्दा वाया जाऊन त्यांना त्यांची कामे वेळेच्या आत करता येत नाहीततसेच ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे शासनाकडून ग्रामविकासासाठी प्राप्त झालेल्या निधीचा सुद्धा वापर ठराविक कालावधीत करण्यात येत नाही व तो निधी ग्रामविकासासाठी खर्च न केल्यामुळे शासनाच्या तिजोरीत परत जातो. यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडला जातो.
आता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लागू होणार असल्याने नागरिकांच्या समस्या सुटणार असून, या निर्णयामुळे ग्रामविकास घडवून आणण्यास सुद्धा मदत होईल.
युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शासन दरबारी निवेदन देण्यात आले व त्याचा सतत पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे आज हे शक्य झाले, या यशाचे खरे मानकरी युवाशक्ती ग्रामविकास संगठन चे सर्व पदाधिकारी व सदस्य आहेत.