नेहमीच चर्चेत असणारी, धनदांडग्या श्रीमंतांना योजनेचा लाभ देणारी ग्रामपंचायत
खामगाव:-(अजयसिंह राजपूत)
तालुक्यातील संभापूर मधील सत्ताधारी असणारे पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या अटी शर्थीचे उल्लंघन करून स्वतः चा आर्थिक हित साधण्याचे काम केले आहे. आणि पात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवल्या जात आहे.आजपर्यंत जी घरकुल योजना देण्यात आली ज्यांचे घर चांगले आहे त्यांनाच पहिले संधी देण्याचे गंभीर प्रकार झालेले आहेत. हे चित्र संभापूर गट ग्रामपंचायत मध्ये पहावयास मिळत आहे.गरजू, विधवा, दिव्यांगांना घरकूल यादीतून डावलण्यात आले. त्यामुळे विधवा, दिव्यांग, वयोवृद्ध व गरजू ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. त्यातून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून घरकूल यादीत सदस्य व आपल्या नातेवाईकांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप केला.पक्के घर असूनही त्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. अनेक वर्षांपासून घरकुलापासून वंचित लोकांना डावलण्यात आल्याचा आरोपही केला.
नियमानुसार आत्महत्याग्रस्त, विधवा, दिव्यांग, शेतमजूर, परित्यक्ता आदी गरजूंना प्रथम लाभ देणे गरजेचे असते. मात्र, त्यांना डावलून धनदांडग्या लोकांची, नातेवाईकांची नावे घरकूल लाभार्थी यादीत समाविष्ट केली. यामुळे गरजूंवर अन्याय झाल्याची कैफियत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोर मांडली.निकषानुसार गरजवंतांना लाभ देण्याची मागणी करून,यावर सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.