Home Breaking News महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर केंद्रस्थानी कसे आले…!!

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर केंद्रस्थानी कसे आले…!!

१९८० पासुन सलग ४२ वर्षे आंबेडकरवादी वैचारिक भूमिका घेऊन अॅड प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर राजकारण करीत आहेत….!!
गेल्या ४२ वर्षात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक आरोप केले गेले परंतु तरीही कुठल्याही आरोपाने विचलीत न होता,स्थितप्रज्ञ होऊन कुणावरही प्रत्यारोप न करता आपल्या कृतीतून उत्तर देतं ते खंबीरपणे आपली वाट चालतं राहिले…!!

त्यांचे समकालीन रिपब्लिकन नेते वैचारिक बांधिलकी तोडून, अनैसर्गिक युती- आघाडी करुन विषमतावादी विचारांच्या राजकीय पक्षासोबतं जाऊन सत्तेची पदे त्यांनी उपभोगली अशाही काळात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याग पत्करला सत्तेच्या तुकड्यांना महत्त्व दिले नाही, कणखरपणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा कायम राखतं वाटचाल करीत राहिले.आणि अतिशय कष्टाने आंबेडकरी राजकारणाला स्वाभिमानी राजकारणाचा नवा चेहरा परिधान केला…!!

एका बाजूला सामाजिक पातळीवर सामाजिक एकोपा निर्माण करीत दुसऱ्या बाजूने बहुजनांच्या ऐकीसाठी सोशल इंजिनिअरींग करीत,प्रस्थापित राजकीय पक्षांनी आमिषे देऊन समाजात झपाट्याने पाझरणा-या लाचारी ला रोखण्यासाठी नव्या पिढीत स्वाभीमानी बाणा रुजवितं नवनवे राजकीय प्रयोग करीत आले आहेत…!!

१९९३ साली बहुजन महासंघ स्थापन करुन महाराष्ट्रात राजकीय जागर करीत १९९५ ची विधानसभा भारिप बहूजन महासंघाने ताकदीने लढविली, त्याचा परिणाम असा झाला की, गेल्या ३० वर्षापासुन महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस पक्षाची सत्ता गेली आणि शिवसेना भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारुढ झाले…!!
प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहूजन महासंघाने प्रस्थापित कॉंग्रेस पक्षाला सत्तेतून हाकलून दिले हे सिद्ध झाले…!!

१९९६ साली देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी शरद पवारांच्या कॉंग्रेस पक्षाला केवळ १५ जागा राखता आल्या ३३ जागी शिवसेना भाजप युती यशस्वी झाली होती.त्याला भगवी लाट म्हणतं होते….!!

१९९५ मध्ये राज्यातील सत्ता गेली आणि १९९६ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पानिपत झाले तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहूजन महासंघाच्या ताकदी मुळे आपणं सत्तेबाहेर फेकल्या गेलो याची जाणीव कॉंग्रेस पक्षाला झाली आणि म्हणून मग १९९८ साली लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाने भारिप बहूजन महासंघा सोबतं युती केली…!!
१९९८ साली कॉंग्रेस पक्षाची रिपब्लिकन पक्षासोबतं निवडणुक युती झाली म्हणून कॉंग्रेस पक्षाचे १५ वरुन झेप घेतं ३३ खासदार निवडून आले आणि रिपब्लिकन पक्षाचे ४ खासदार निवडून आले होते, शेतकरी कामगार पक्षाचा १ खासदार निवडून आला आणि भाजप सेनेला १० खासदारांवर समाधान मानावे लागले होते…!!

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय ताकदीने हे दाखवून दिले की, १९९५ मध्ये कॉंग्रेस पक्षाला राज्यातील सत्तेबाहेर हाकलून दिले. तसेच १९९८ मध्ये भगवी लाट असुनही भाजप शिवसेनेला ३३ खासदारांवरुन खाली खेचतं जमीनीवर आणून ठेवले, त्यांना केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले हा इथल्या राजकारणाचा इतिहास आहे…!!

२०१९ च्या लोकसभा निवडणुकी मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची पकड असलेल्या सलग २५ वर्षापासुन खासदार असलेल्या जागेवर वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम खासदार निवडून आणून हे सिद्ध केले की, आम्ही कुणालाही चितपट करु शकतो आणि झिरो ला हिरो बनवू शकतो…!!

वरील राजकीय घटना आणि अनुभवातून हे सिद्ध झाले की, अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या ४२ वर्षाच्या राजकीय प्रयोगातून त्यांनी निर्माण केलेली ताकद ही कॉंग्रेस पक्षाला सत्तेबाहेर हाकलून देऊ शकते तसेच ती कॉंग्रेस पक्षाला तारुही शकते…!!
वरील अनुभवातून हेही सिद्ध झाले की, भगवी लाट असो की कुठलीही लाट असो बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे असलेल्या मतांची ताकद ही भाजप शिवसेने सारख्या पक्षाला धुळ चारु शकते त्याचे ताजे उदाहरण म्हणजे २०१९ ची औरंगाबाद लोकसभा निवडणुक…!!

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ च्या निवडणुकीत तब्बल ४५ लाख मते घेऊन वंचित बहुजन आघाडीने आपला राजकीय दबदबा कायम ठेवला आहे नव्हे ती निर्णायक ताकद आहे हेही सिद्ध केले आहे…!!

आजरोजी वंचित बहुजन आघाडीकडे,आंबेडकरवादी, तथा अलुतेदार बलूतेदारांची, भटके विमुक्त समुहाची भक्कम ताकद निर्माण झाली आहे याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना आलेला आहे आणि म्हणून तुकडे झाल्यामुळे हतबल झालेली शिवसेना, राज्यातून संपतं चाललेली कॉंग्रेस, आणि पश्चिम महाराष्ट्रापुरती सिमीत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते वंचित बहुजन आघाडी सोबतं युती करायला तयार आहेत. त्याचे कारण भूतकाळातील अनुभवात दडलेले आहे…!!

१९९९ मध्ये जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हा महाराष्ट्रातून कॉंग्रेस पक्ष संपवायचा चंग बांधून शरद पवारांनी सगळे मराठा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतले आणि कॉंग्रेस पक्षाला घरघर लागली तेव्हा २००० च्या विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने कॉंग्रेस पक्षासोबत युती करून कॉंग्रेस पक्षाला वाचविले होते ,भारिप बहुजन महासंघाचे तीन आमदार निवडून आले होते मखराम पवार, डॉ दशरथ भांडे, रामदास बोडखे हे तीन मंत्री २०००च्या कॉंग्रेस पक्षाच्या विलासराव देशमुख मंत्रीमंडळात मंत्री होते हा महाराष्ट्राचा भुतकाळ आहे…!!

आजरोजी कॉंग्रेस पक्ष तुटून दोन कॉंग्रेस झालेल्या आहेत, शिवसेना तुटून दोन सेना मैदानात आहेत, आणि रिपब्लिकन पक्षाचे चार नेते होते त्यापैकी एकही तगला नाही म्हणून संपुर्ण आंबेडकरवादी मतदार अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी एकजुटीने ऊभा आहे हीच ताकद भाजपला रोखू शकते,वंचित बहूजन आघाडीला वगळून भाजपला रोखणे शक्य नाही म्हणून अॅड बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्र स्थानी आलेले आहेत…!!
@ भास्कर भोजने.9960241375 @

 

Previous article*शेगाव तहसीलदार यांना निषेध निवेदन सादर*
Next articleग्रामपंचायत शेळदमध्ये सौ.अर्चना पंजाबराव तिडके यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी…….