Home Breaking News लाखो भाविकांचे श्रध्दास्थान माहूरची रेणूका देवी!

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान माहूरची रेणूका देवी!

परभणी, (आनंद ढोणे) :- नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालूक्यातील माहूर गडावर वसलेल्या रेणूकामाता देवी लाखो भाविक भक्तांच्या श्रध्दास्थान असल्याचे सर्वदूर प्रसिद्ध आहे. दरवर्षी माहूर गडावर भव्य दिव्य असा नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी मोठ्या भक्ती भावात संपन्न होत आहे. गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद होती.त्यानंतर यंदा कोरोना परिस्थिती नसल्यामुळे धार्मिक स्थळे खुली असल्यामुळे सर्वत्र नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे.
—————-
रेणूका देवीचे मंदिर अर्थात माहूर गड माहूर शहरापासून जवळच डोंगरावर नैसर्गिक सौंदर्याच्या सानिध्यात वसलेले आहे.पूर्व काळी देवगिरीच्या यादवाचा राजा यांनी रेणूका देवी मातेचे मंदिर सुमारे आठशे-नवशे वर्षापूर्वी बांधण्यात आले होते.दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी रेणूका देवीच्या सन्मानार्थ भक्तांचा मोठा मेळावा भरत असतो.साडेतीन शक्तीपिठापैकी एक मुळ जागृत पीठ म्हणजेच माहूरची रेणूकामाता होय. श्री परशूरामाची माता म्हणून रेणूकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यातील असंख्य भाविक भक्तांची रेणूका देवी कुलदैवता आहे.माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला असी भाविक भक्तांची श्रध्दा मानली जाते.
आख्यायिका
—————-
एका कथेनूसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जाते घेतला. तीचे नाव रेणू असे ठेवण्यात आले.श्री शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचा विवाह झाला.जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत.सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती.राजा सहस्रार्जुनाला कामधेनू गायीचा मोह झाला.त्यांनी जमदग्नीकडे कामधेनू मागीतली.ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही.तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला.आश्रम उध्वस्त करुन जमदग्नीला ठार मारले व कामधेनू हिरावून नेली.नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला.घडलेला प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे प्रार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणूकेला बसवले.रानोमाळ भटकंती करीत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या श्री दत्तात्रयांनी त्याला कोरी भूमी दाखवली आणि ईथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले.परशूरामाने प्रथम बाण मारुन मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले.या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणूका सती गेली.या सर्व विधींचे पौरोहित्य श्री दत्तात्रयांनी केले.त्यानंतर परशुरामाला माता रेणूकेची खूप आठवण येवू लागली.तो दु:खी होऊन शोक करीत होता, तोच आकाशवाणी झाली.तूझी आई जमीनीतून वर येऊन तूला दर्शन देईल.फक्त तू मागे पाहू नकोस.परंतू,परशूरामाची उत्सुकता चाळवली गेल्यामुळे त्याने मागे वळून पाहिले.त्यावेळी जमीनीतून रेणूकामातेचे केवळ मुखच वर आले होते.तेवढेच परशूरामाला दिसले.या तांदळा रुपातील मुखाचीच माहूरला पुजा होते.परशूरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून या डोंगराला मातापूर म्हणू लागले.शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे ते माहूर झाले. अशा ह्या रेणूकादेवीच्या माहूरगडावर दरवर्षी नवरात्रात महोत्सव काळात महाराष्ट्रा बरोबरच आंध्रा तेलंगणातूनही लाखो भाविक रेणूका देवी मातेचे दर्शन घेण्यासाठी येवून भक्तांची अलोट गर्दी जमत असते.माहूरगडावर या दिवसात एक भक्तीमय वातावरण निर्माण होऊन तेथे मातेच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता जाण्यासाठी प्रत्येकात ओढ निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. माहूरगडावर जाण्यासाठी नांदेड आगारातून व तेलंगणा येथून भक्तांसाठी विशेष बस सोडल्या जातात.

Previous articleपांगरा गाव विकास कामात सदा अग्रेसर!
Next articleशेतकऱ्यांच्या पदरी शेवटी निराशा !