परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील माहेर या ५०० लोकसंख्या असलेल्या गावाला जाण्यासाठी भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या काळातही 3 किमी अंतर लांब असणाऱ्या कच्च्या काळ्या मातीमिश्रीत चिखलमय रस्त्याचे पक्के मजबुतीकरण व डांबरीकरण काम झालेच नाही.त्यामुळे माहेर करांनी अनेक वेळा तहसीलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिली. तीन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणे केली. त्यावरुन तहसीलदार पल्लवी टेमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी तात्काळ रस्त्याचे काम चालू करु म्हणून आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात कृती झालीच नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त व वैतागून जाऊन गेल्या सहा दिवसापासून आगळेवेगळे आंदोलन चालू केले आहे. यात,उघडे होऊन थाळी वाजो आंदोलन,रस्त्यात झालेल्या चिखलात लोळून, खाटेवर बसवून आजारी नागरीक रुग्णांची मिरवणूक आणि आज तारीख 30 सप्टेंबर 2022 रोजी 80 फूट उंच पाण्याची टाकी जलकुंभावर बसून हल्लाबोल आंदोलन केले. तरीही अद्याप प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दख्खल घेतलीच नाही. सदरील रस्त्याच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना बाहेर गावी पावसाळ्यात शिक्षण घेण्यासाठी जाता येत नाही.शेती उत्पादीत कच्चा माल विक्रीसाठी बाजाराच्या ठिकाणी नेता येत नाही. आजारी पडलेल्या माणसांना उपचारासाठी रुग्णालयात नेता येत नाही.अशा नुकसानामुळे गावकरी परेशान असताना जिल्हा प्रशासन त्यांची दख्खलच घेत नाही. केवळ सदर रस्ता करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 60 लक्ष रुपयाचे नियोजन केल्याचे आश्वासन देऊन बोळवण करताहेत.त्यामुळे असे पोकळ आश्वासनावर गावक-यांचा विश्वास राहीला नाही. दरम्यान, पाच दिवसापूर्वी या गावात आता राहणेच नको म्हणून वैतागून जात तहसीलदार यांना निवेदन देवून आमचे माहेर गाव घरे, जमीनी, व ईतर स्थावर मालमत्ता विक्रीस काढल्याचे जाहीर केले आहे.