Home कविता कविता

कविता

अंगद सुरोशे भुमीराजा न्युज हिमायतनगर / प्रतिनीधी

पाया पडतो साहेब
कायदा करा नवा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

वर्गात गुरूजीचं मस्त
शिकवणं सुरू होते
तेवढ्यात आॅफिसमधून
तुमचा फोन येते
वृक्षारोपण अहवाल
ताबडतोब हवा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

साहेब खिचडी तुमची
अशी कशी भारी
गुरूजी गंजापुढे
नुसत्या चकराच मारी
किडा किटक खडा
दिसू देवू नको देवा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

सुटका करा खिचडीतून
त्यांना मिळू द्या उसंत
तेव्हाच आमच्या बागेत
छान फुलेल हा वसंत
ही वेगळी करा यंत्रणा
तेव्हा लागेलआमचा दिवा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

प्रशिक्षणासाठी गुरूजीला
तुम्ही नेता किती वेळ ?
त्यावेळी आम्हा त्याची
किती बसते झळ ?
कसा उडेल आकाशी
उंच आमचा थवा ?
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

ऑनलाईन कामात गुरूजीला
एवढे गुंतवून ठेवता
नाही झाले काम तेव्हा
करवाईची भाषा करता
मिटींग घेवून तुम्ही
तुमचाच वाजवता पावा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

कपडे,शिष्यवृत्ती,खिचडी
हे मुख्य ध्येय नाही
भौतिक सुविधा पुरवून
कोणी मोठं झालं नाही
खर्या खुर्या ज्ञानाचा
तुम्ही चाखू द्या मेवा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

साहेब प्रत्येक उपक्रम तुमचा
गुरूजीला आमच्यातून दुर नेते
याच ठिकाणी खरोखर
गुणवत्ता मार खाते
शिक्षण तज्ज्ञांच्या ही गोष्ट
कोणी लक्षात आणा रे भावा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

साहेब तुम्ही गाजावाजा केला
ई लर्निंग सुरू केलं
विज बिल थकल्यावर
मिटर काढून नेलं
अशा वेळी तुम्हीच सांगा
कोणावर ठोकावा दावा?
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

खेड्यात कुठली आली विज ?
आपला खडू फळाच बरा
चैतन्याचा चैतन्याशी
वाहत राहतो झरा
गुरूचा शिष्याला आता
तुम्हीच लळा लावा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

साहेब तंत्रज्ञान नवे आले
आले थ्रिजी फोर जी
त्यावर सगळ्यात भारी
असतात आमचे गुरूजी
त्यांच्या हातून ज्ञानाची
अखंड घडू द्या सेवा
आमच्या गुरूजीला फक्त
आमच्या वर्गावर ठेवा ॥

!वर्हाडी कवी!… नितिन वरणकार
शेगाव जि बुलडाणा

Previous articleशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून.. शेतकऱ्यांना सरसकट 75 हजार रुपये अनुदान देण्यात यावे – आ. माधवराव पाटील जळगावकर
Next articleकेंद्रीय कृषीमुल्य आयोगाचे पाशा पटेल आणि गुणवंत पाटील हंगरगेकर यांचा वसमत येथे सत्कार आयोजित