Home कृषीजागर परभणी-हिंगोली-नांदेड जिल्ह्यात मुसळधार प्रजन्यवृष्टी, पिके खरडली!

परभणी-हिंगोली-नांदेड जिल्ह्यात मुसळधार प्रजन्यवृष्टी, पिके खरडली!

शेतक-याचा कल पिक विमा भरण्याकडे!!

परभणी, मराठवाडा विशेष प्रतिनिधी, (आनंद ढोणे पाटील):-मराठवाडा विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील परिसरात ८ जुलै २०२२ रोजी रात्रभर मुसळधार- जोरदार पृजन्यवृष्टी झाल्यामुळे सखल जमीनीतील खरीपाची सोयाबीन, तूर, मुग, उडीद, संकरित ज्वारी, हळद, कापूस ही पिके खरडून गेली आहेत.सध्या चालू असलेल्या संततधार तसेच जोरदार, रिमझिम झडीच्या पाऊसाने सर्व नद्यांना पूर आलाय तर शेत शिवारातील वळण नाले दुधडी भरुन वाहत आहेत. लोहा तालुक्यातील तर वडेपूरी गावाजवळील शेतात जाणाऱ्या ओढ्यावरील वडेपूरी-टेळकी पूल मुसळधार पावसामुळे तूटून गेल्याने शेतात जाण्या येण्यासाठीचा संपर्क बंद झाल्याची माहिती शेतकरी लखन बोडके यांनी दिली असून नांदेड भागात जोरदार पाऊस चालू असल्याचे भूमीराजाशी बोलताना त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या पाच दिवसापासून चालू असलेल्या कधी मुसळधार, जोरदार तर कधी रिमझिम झड पाऊस चालूच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे ग्रामीण भागातील नदी नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक करणे मुश्किल होत आहे. आठ दिवसापूर्वी पाऊसाने चांगलीच उघडीप दिली तेव्हा शेतकरी चिंतेत होते आता मात्र वरुणराजाने चांगलेच मनावर धरल्यामुळे जिकडे पहावे तिकडे चोहीकडे पाणीच पाणी करुन टाकले असून म्हणतातना “चार महिन्याचा उन्हाळा अन् एक दिवसात पाऊसाळा” याच म्हणीचा प्रत्यय वरुण राज्याच्या कृपादृष्टीने येत आहे. अजून देखील पाऊस चालूच आहे. आकाशात पावसाच्या ढगांनी काळाकुट्ट अंधार दाटून दिसतोय. मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस पडेल, असे भाकीत या अगोदरच परभणी जिल्ह्यातील गुगळीधामणगाव येथील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील यांनी वर्तवले होते.ते सत्यात उतरत आहे.यंदा देखील पाऊसकाळ भरपूर होणार? अतिवृष्टीचे संकेत दिसत असल्यामुळे खरीपातील पिके जातील म्हणून शेतक-याचा कल पिकाचा विमा भरण्याकडे दिसत आहे. सध्या सोयाबीन सह खरीप हंगामातील सर्वच पिके लहान कोवळी असल्याने संततधार पाऊस त्याच्या मुळीलाच लागल्यामुळे शेतक-याची मदार पिके विम्याकडे दिसते खरी मात्र असंख्य शेतक-यांना गत वर्षिचाच पिक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही तरी शुध्दा आशेवर जगणारा शेतकरी पिक विम्यावर विश्वास करतोच. परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना गेल्या वर्षी रिलायन्स जनरल पिक विमा कंपनीने फसवले होते. कोट्यवधी रुपये विमा हप्त्यापोटी भरुन घेवूनही अतिवृष्टी मुळे सगळी खरीप पिके नष्ट झाली तरी रिलायन्सने विमा भरपाई दिलीच नाही.विम्यापोटी करोडो रुपयांची लूट केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी “गो बॅक रिलायन्स” आंदोलन करुन या कंपनीस जिल्ह्यातून हद्दपार केले. या वर्षी आय सि आय सी आय लोम्बार्ड विमा कंपनी आली आता ती काय दिवे लावती? हे पुढील काळ ठरवणार आहे. तिनही जिल्ह्यात सोयाबीन ह्या तेलबिया पिकाचा मोठा पेरा असून शेतकरी अधिक प्रमाणात या पिकाचा विमा भरुन नुकसान भरपाईची आशा करतात परंतु नूकसान होवूनही त्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे ब-याच जाणकार शेतकरी वर्गाने पिक विम्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. सध्या पडणा-या संततधार पावसाच्या पाण्याने नदी नाल्यांना पूर येवून संपर्क तुटत आहे. पावसामुळे हवामानात बदल झाल्याने आणि त्याबरोबर विजेची खांब कोसळणे, तार तुटने, फाल्ट होणे या कारणामुळे विज पुरवठा खंडीत होत आहे.शिवाय मोबाईल मधील सिम कार्डची कनेक्टिव्हिटी जात असल्याने संपर्क बंद होताहेत. नेट कनेक्ट गेल्याने आवश्यक कामे ठप्प झाली आहेत. सातत्याने पडणा-या पाऊसाच्या पाण्याने ओढावलेली नैसर्गिक आपत्ती निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची टिम नजर ठेवून असल्याचे समजते.

Previous articleदोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस.
Next articleहिमायतनगर तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक गावाचा तुटला संपर्क….