Home कृषीजागर मृग नक्षत्राने मारली दडी, पावसाळा लांबला,शेतकरी चिंतातूर!

मृग नक्षत्राने मारली दडी, पावसाळा लांबला,शेतकरी चिंतातूर!

परभणी,( जिल्हा प्रतिनिधी) – गत वर्षी ४ जूनला मोठा पाऊस पडला होता. त्यानंतर सरीवर सरी कोसळत राहिल्याने जून मध्ये खरीप पेरण्या आटोपल्या. त्या उलट या यंदा मात्र ७ जून उलटूनही मृग नक्षत्राचा पाऊस न पडता त्याने दडी मारल्यामुळे पावसाळा लांबला आहे.शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गतवर्षी च्या तुलनेत या वर्षी एकही आवकाळी पाऊस पडला नसल्यामुळे वातावरणातील उकाडा आणि कडक उन्हं कायम आहे. अजून उन्हाळाच मोडला नाही. दिवसा कडक उन्हं अन् रात्री आकाशात टिपूर चांदणं दिसतयं.सर्वत्र मशागत होवून काळीभोर रानं चातक पक्षा प्रमाणे पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. चार दिवसाखाली हलक्याशा सरी आल्या.. ज्या की, जेवणाच्या पंक्तीत धुराळा उडू नये म्हणून पाण्याचा सिडकावा द्यावा तशाच.. याच सरीची धास्ती घेत आता पावसाळा सुरु होणार.. या हेतूने शेतकऱ्यांनी कृषी बाजार गाठून बि बियाणे, रासायनिक खते याची तजवीज करुन ठेवली. परंतु, पाऊस काही पडतच नाही. जूनची १५ तारीख उलटतानाही आकाश कोरडेठाक दिसतेय. सोबतच उन्हाचा पारा कायमच आहे. पाऊस पडत नसल्याने शेतातील उभी ऊसं, भाजीपाला या पिकाच्या पाणी पाळ्या चालूच ठेवाव्या लागताहेत. जनावरासाठी चा-याचा वाणवा होतो आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, संकरीत ज्वारी, तूर, मुग, उडीद, पिवळा-पिवळा, पांढरा पिवळा या बियाण्याचे भाव वाढलेत.मुगी,गावरान काटेरी भेंडी,गावरान काटाळ चवदार असणारे वांगे, गावरान चवळी जेकी, (पूर्वी कोरडवाहू जमीनीत पाण्याच्या ओळीत भेंडी व चवळी पेरणी करायचे) हे गावरान बियाणे तर कुठेच न भेटता दूर्मिळ झालेत. त्या बरोबरच रासायनिक खतांचे शुध्दा दर वधारलेत. डि ए पी खतांचे कृत्रिम शाॅर्टेज सांगतात. शिवाय, कृषी दुकानदार ठरवून दिलेल्या दराला दांडी मारुन चढ्या भावाने विक्री करतात. बिल मात्र वास्तविक लिहीतात.बिछाईत खातेदारास आडत दुकानावरुन सोयाबीन या अशंसोधीत बियाण्याला बियाचे बी म्हणून जुनेच जनरल सोयाबीन चाळणी मारुन चढ्या दराने विकतात. त्यावरही पुढे सोयाबीन पिक येईपर्यंत पाच टक्के व्याज अकारुन शेतकऱ्यांना लूटतात. तरी बिचारा शेतकरी नाईलाज असल्याने चोरासारखा गप्प बसून कुठेच वाच्यता करीत नाही. तसे केल्यास आडत दुकानदार त्यास हाकलून लावेल म्हणून देईल त्या भावात घेतोच असी सत्य परिस्थिती सर्वत्र आहे. असे सारे कुटाणे करुन शेतकऱ्यांनी बियाणे खतांची तजवीज केली खरी पण आता पाऊसच पडत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग आयूष्याचे मार्गक्रमण करताना त्यांना कोण्हीच वाली नसतो. त्याच्या लेकरांना कपडे नसतात. खायला बरोबर नसते. शिक्षणाला पैसा नसतो. त्यातच दुख सुख दवाखाना, लग्न कार्य कपडे आहेर, हे शुध्दा पार पाडावे लागतेच.साधा सरकारी चपराशी दहा एकर जमीनवाल्याची बरोबरी करतो. तरी शेतकरी जगासाठी काबाडकष्ट करुन अन्नधान्य पिकवतो. जगाचा पोशिंदा असूनही कृषी प्रधान भारतात त्याची उपेक्षा चोहू बाजूने कायम आहे. शेतीत उत्पन्न होवूनही उत्पादन खर्च काढला तर हातात काहीच उरत नाही. त्यातच गगनाला भिडलेल्या महागाईमुळे तो कधीच सुधारत नाही. आता पाऊसही लांबल्याने तो हिरमुशला आहे.

Previous articleआमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांची काम करण्याची कार्यशैलीच वेगळीच!
Next articleकल्याण डोंबिवली महानगर पालिकेरील धडक मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे