तालुक्यातील खडकी बा आणि पावनमारी परिसरातील दुर्घटना
अंगद सुरोशे
हिमायतनगर, | नांदेड जिल्हाभरातील अनेक तालुक्यात दि.१२ च्या रात्रीला वादळी वारे, विजांचा गडगडाट होऊन अवकाळी पाऊस झाला आहे. असाच प्रकारे अवकाळीचा संकट हिमायतनगर तालुक्यावरही आले असून, रात्री ८ पासून सुरु झालेल्या विजयाच्या गडगडाटात वीज कोसळून मौजे पावनमारी आणि खडकी बा.परिसरातील दोन शेतकऱ्यांच्या गाय आणि म्हैस दगावली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, शासनाने आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात द्यावं अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकली बा.येथील शेतकरी नागोराव सूर्यभान सूर्यवंशी हे नेहमी प्रमाणे आखाड्यावर गावरान गाय बांधून घरी गेले होते. दरम्यान रात्री ८ नंतर वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडातला सुरुवात झाली. दरम्यान आभाळात कडाडलेली वीज अंदाजे वय ७ वर्ष असलेल्या पांढऱ्या गाईवर पडल्याने गाय दगावली. यात त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी महोदयांनी केला आहे.
तर दुसऱ्या एका घटनेत राजू ग्यानबाराव सूर्यवंशी रा.खडकी बा. येथील शेतकरी असून, यांची शेती पावनमारी शिवारात आहे. यांनी देखील नेहमीप्रमाणे आखाड्यावर म्हैस बांधून घर गाठले होते. त्यानंतर रात्री ८ ते ९ वाजेच्या वेळेत सुरु झालेल्या वादळी वारा विजांच्या गडगडाटात ६ वर्ष वय असलेल्या गाभण म्हशीवर वीज पडल्याने म्हैस दगावली. यात त्यांचे ९५ हजारांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही घटनेचा पंचनामा खडकी सज्जाचे तलाठी यांनी पंचासमक्ष केला आहे. या घटनेमुळे नुकसानीत आलेल्या दोन्ही शेतकऱ्यांना शासनाने आपत्कालीन निधीतून मदतीचा हात द्यावा अशी मागणी पंचासह गावकर्यांनी केली आहे.