या धरतीवर आली कितीतरी , नररत्ने ती जन्माला
परी न भिमबाबासम दुजा , यासम हाचि घडला,
स्वकर्तृत्वाने अथक प्रयासे , विश्वात चमकला
बुद्धाचा हा निळा धम्म ध्वज आसमंती फडकला
हाक ऐकुनी दलितांची , चवदार तळ्याचा लढा दिला
तळे अन काळाराम मंदिर, दलितांसाठी खुला केला,
नवविचारा नवभाकिता , दीन दलित उद्धारीला
शिक्षणाची ज्योत पेटवून, शिखर वैभवी गेला
राज्यघटना लिहून भारताचा शिल्पकार मिरवला
भिमाईचा पुत्र हा महान , भारतरत्न गौरविला,
एक ध्यास एक आस , बांधवांसाठीच झटला
कोटी कोटी प्रयत्नांनी , दीनबंधू शिकविला.
अंधश्रद्धेला देऊन मुठमाती ज्ञानदिशा उजळल्या
दगडी देवा बुडवून त्यांची, केली पाण्यात गच्छंती,
पिटाळून गुलामगिरीला शान भारताची वाढवली
नाळ मानवतेशी जोडता, विश्वरत्न, बोधीसत्व महती
भीमाच्या या निळ्या झेंड्याचा, मान आम्ही राखतो
संघटित, सुशिक्षित होऊनी, ज्ञान महत्व जाणितो,
धम्म दीप देई प्रकाश , नित सत्य मार्ग दावितो
महाज्ञानी महामानवाला कृतकृत्य होऊनी वंदितो
कवयित्री: सरोज सुरेश गाजरे
भाईंदर, ठाणे