बोरगडीच्या मल्लेश पैलवानाने पटकावली पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षीस…
हिमायतनगर प्रतिनिधी – कृष्णा राठोड
तालुक्यातील मौजे सरसम (बु) येथे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला आहे. दोन वर्षांच्या काळानंतर यावर्षी बारशी निमित्त बसवेश्वर मंदिर कमिटी च्या वतीने आयोजित जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमास तालुका, जिल्हा नव्हे तर आदिलाबाद आंध्रप्रदेश, देगाव ,भोकर, नांदेड तसेच अनेक दूरवरच्या खेड्यापाड्यातून आणि शहरातून कुस्त्या खेळण्यासाठी मातब्बर आणि कसलेल्या गुणांनी परिपूर्ण असलेल्या पैलवानांनी हजेरी लावली होती. तसेच या मैदानात जंगी कुस्त्यांच्या सामन्यातील चित्तथरारक दृश्य प्रेक्षकांना अनुभवता आले.
जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात गावातुन येणाऱ्या भगव्या झेंड्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने व डफली च्या तालावर वाजत गाजत येणाऱ्या नागरिकांकडून बसवेश्वरांना नमन करून झाली. प्रथमता लहान लहान पण त्याही एकापेक्षा एक रंगत आणणाऱ्या कुस्त्या झाल्या. यावर्षीच्या कुस्त्यांच्या सामन्यात बोरगडी च्या कसलेल्या आणि मातब्बर पैलवानांचा दबदबा पहावयास मिळाला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कुस्त्यांचा कार्यक्रम प्रेक्षकांना भुरळ घालणारा होता. कुस्त्यांचा हा कार्यक्रम पाहण्यात प्रेक्षक एवढे तल्लीन झाले होते की त्यांनी शेवटची कुस्ती होईपर्यंत जागेवर कोणी हलले नाहीत. कुस्ती कमिटीतर्फे जारी केलेल्या नियम आणि अटीच्या आधारावर या कुस्त्या खेळण्यात आल्या.
यासाठी प्रथम बक्षीस ३००१ प्रकाशराव विठोबा वानखेडे यांच्या स्मरणार्थ ऍड अतुल प्रकाशराव वानखेडे यांच्या तर्फे होते. हे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस बोरगडी येथील मातब्बर पैलवान मल्लेश यांनी जिंकले.तर दुसरे बक्षीस २००१ रुपये कै. माधवराव गोविंदराव ढेमकेवाड यांच्या स्मरणार्थ श्री रमेशराव ढेमकेवाड सहशिक्षक श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम (बु) यांच्यातर्फे तर तिसरे बक्षीस ११११ रुपये होते हे कै. सुनीताबाई अशोकराव दमकोंडवार स्मरणार्थ श्री बाबू दमकोंडवार यांच्यातर्फे होते.शेवटच्या कुस्तीचा सामना एवढा रोमांचक होता की कुस्ती वरून कुणाची नजर हटत नव्हती. चतुर्थीच्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा कॉमेट्री दीपक कल्याणकर यांनी केली.
कुस्त्यांच्या या कार्यक्रमास सोबतच भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री नामदेव गंगाराम डाके ,उपाध्यक्ष श्री काशिनाथ रामजी मंडलवाड, सचिव संजय बाबुराव मंडलवाड ,कुस्ती कमिटीचे अध्यक्ष श्री साईनाथराव लक्ष्मण शिंदे ,उपाध्यक्ष श्री रमेश माधवराव ढेमकेवाड,सचिव श्री केशव विठ्ठलराव मंडलवाड, सल्लागार श्री उत्तम पोशटी मंडलवाड तसेच मंदिर कमिटीचे व कुस्ती कमिटीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास सरसमचे माजी सरपंच श्री सुनील वानखेडे ,साईनाथ शिंदे, विजय विठ्ठलवाड,ग्रामपंचायत सदस्य तथा डाके कोचिंग क्लासेसचे संचालक डाके सर,पत्रकार गोविंद गोडसेलवार, पत्रकार विजय वाठोरे,पत्रकार प्रशांत राहुलवाड,दीपक कल्याणकर सह गावातील व पंचक्रोशीतील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.