Home Breaking News राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण

राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण

 

हिमायतनगर (नांदेड)- कृष्णा राठोड
हिमायतनगर मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ चे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने चालू असल्याने वादाच्या भोवऱ्यात फिरत असून या राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगर मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या बांधकामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांवर अपघात घडत आहेत.यातच शहरातील श्री परमेश्वर कमानी जवळील पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यांमध्ये हिमायतनगर येथील दैनिक लोकमतचे पत्रकार दिलीप शिंदे यांचा अपघात झाला असून खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीसह ते खड्ड्यात जाऊन पडल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. दिलीप शिंदे हे उमर चौक येथून आपल्या घराकडे सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास जात असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते गाडीसह खड्ड्यात जाऊन पडले.त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांची परिस्थिती नाजूक असल्या कारणास्तव रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
रेल्वे स्थानक ते उमर चौक मधील पुलाचे व रस्त्याचे काम अर्धवट ठेवले असून यामुळे शहरात अपघातांना निमंत्रण मिळत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.हिमायतनगर मधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तीन पूल असून यापैकी एका पुलाचे काम पूर्ण होत आहे तसेच इतर पूल हे लांबणीवर पडले असून शहरातील कमानी जवळ असलेल्या पुलाचे बांधकाम खड्डे करून सोडून दिले असल्या कारणाने तेथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्याचे काम अर्धवट सोडले असून त्या रस्त्यावरील धुळीमुळे व बांधकाम रखडल्यामुळे रस्त्यावरील गिट्टी मुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून कधी काय होईल याचा नेम नाही.
जिथे अपघात झाला तेथील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडून ठेवून दोन्ही बाजूकडून खड्डे करून ठेवल्यामुळे ठेकेदाराने येते कोणतीही सूचना फलक लावलेले नाहीत. रात्रीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेडियम ची दिशा दर्शक फलकेही येथे लावलेली नसल्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना येथील खड्डेमय रस्त्यांमुळे अंदाज येत नसल्याने अडखळून पडत आहेत. रात्रीला येथे कोणतीही विद्युत सोय नसल्यामुळे अंधार असल्या कारणाने अपघाताला वाव मिळत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना कामाच्या ठिकाणी सूचनाफलक ,दिशादर्शक फलक तसेच वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सोय केलेली नाही. ठेकेदाराने काही राजकीय लोकांना हाताशी धरून राष्ट्रीय महामार्गाचे काम आपल्या मर्जीने करत असल्यामुळे शहराच्या विकास कामाचे तीन तेरा वाजले आहेत . या रखडलेल्या बांधकामांमुळे अजून किती जणांचे अपघात होतील की आणि किती जणांना आपला जीव गमवावा लागेल ? असा सवाल वाहनधारकांकडून होत आहे. याबाबत गुप्तेदारावर कारवाई करावी व याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विकास प्रेमी जनतेतून केल्या जात आहे.

Previous articleआंब्याचं झाड
Next articleराष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण