माह्या बापाच्या शेतात
हाय आंब्याचं ते झाड,
आज्या पणज्या लावली
आंबा तेचा लई ग्वाड
येता आंब्याले मोहर
सुटे दरवळ भारी,
कैरी पाहून हिरवी
जथा राघूंचा भरारी
कशी साद घाले मैना
रावा हरखून पाहे,
कुहूकुहू कोकिळेची
ताला सूरात ती गाये
श्वान, जित्राप विसावे
छाया आंब्याची गह्यरी,
गर्दी होई पाखरांची
फांदी फांदीले कयरी
काय चव सांगू बाई
जसं वल्लं ते खोबरं,
कैऱ्या पाडाच्या खायाले
डल्ला मारती वानरं
आज गावरान आंबे
नाही भेटत पाहाले
चव त्यांची जीभेवर
लागे टुकणी खायाले
कवयित्री : सरोज सुरेश गाजरे
भाईंदर,ठाणे