Home कविता ब्रम्हाध्वज मांगल्याचा

ब्रम्हाध्वज मांगल्याचा

नवं वर्ष स्वागताला
गुढी उभारु अंगणी,
बांधू तोरण दाराला
पुढे रांगोळी देखणी

वस्त्र रेशमी काठीला
साखरेच्या गाठीसवे,
कडुलिंब, आंबा, पर्ण
झेंडू,चाफा, फुल हवे

भोग नैवेद्य गुढीला
पुरी आणिक श्रीखंड,
वाढो स्वराष्ट्र, संस्कृती
शांती नांदावी अखंड

ब्रह्मध्वज मांगल्याचा
सोडू सारे हवेदावे,
अनुबंध समजुनी
मानवाने झळकावे

शिकू सृष्टीला पाहून
फुलण्याचे गोड तंत्र,
धैर्य,संयम नि त्याग
हाच संजीवनी मंत्र

संकल्पना शिवबांची
परिचय सृजनाचा,
आंबेडाळ, पन्हे स्वाद
ग्रीष्म ऋतू वसंताचा

सौ. सरोज सुरेश गाजरे
भाईंदर, ठाणे

Previous article“एप्रिल फुल”
Next articleविद्यमान आमदार यांच्यावर अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हे दाखल करणेसाठी निवेदन देण्यात आले.